अमरावती - तखतमल मार्केटसह जुन्या शहरातील जर्जर इमारती तात्काळ पाडा
नगरसेवक चंदू खेडकर यांची मनपा आयुक्तांकडे कारवाईची मागणी अमरावती, 28 मे (हिं.स.) अमरावती शहरात पावसाळा तोंडावर आला असताना मुख्य शहर परिसरातील प्रसिद्ध ‘तक्तमल मार्केट’ तसेच जुन्या शहरातील अत्यंत जर्जर व धोकादायक इमारतींमुळे नागरिकांच्या जीविताला
तखतमल मार्केटसह जुन्या शहरातील जर्जर इमारती तात्काळ पाडा


नगरसेवक चंदू खेडकर यांची मनपा आयुक्तांकडे कारवाईची मागणी

अमरावती, 28 मे (हिं.स.)

अमरावती शहरात पावसाळा तोंडावर आला असताना मुख्य शहर परिसरातील प्रसिद्ध ‘तक्तमल मार्केट’ तसेच जुन्या शहरातील अत्यंत जर्जर व धोकादायक इमारतींमुळे नागरिकांच्या जीविताला मोठा धोका निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक १ चे नगरसेवक चंद्रकांत उर्फ चंदू खेडकर यांनी अमरावती महानगरपालिका आयुक्तांना निवेदन देत तात्काळ कठोर कारवाईची मागणी केली आहे.खेडकर यांनी आयुक्तांची प्रत्यक्ष भेट घेऊन शहरातील शिकस्त इमारतींच्या गंभीर समस्येकडे लक्ष वेधले. ‘तक्तमल मार्केट’ हे शहरातील प्रमुख व्यापारी केंद्र असून येथे दररोज हजारो नागरिकांची व व्यापाऱ्यांची वर्दळ असते. मात्र सद्यस्थितीत ही इमारत अत्यंत धोकादायक अवस्थेत असून कोणत्याही क्षणी दुर्घटना घडू शकते, असा इशारा त्यांनी दिला.याशिवाय जुन्या शहरातील अनेक वाडे व इमारती पूर्णपणे जीर्ण झाल्या असून मागील काही वर्षांत अशा इमारती कोसळून जीवितहानीच्या घटना घडल्या आहेत. आगामी पावसाळ्यात मोठा अनर्थ टाळण्यासाठी प्रशासनाने तातडीने उपाययोजना करणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले.“केवळ नोटिसा बजावून प्रशासन जबाबदारी टाळू शकत नाही. वेळीच कारवाई न झाल्यास होणाऱ्या कोणत्याही जीवितहानीची संपूर्ण जबाबदारी महानगरपालिका प्रशासनाची राहील,” असा थेट इशाराही खेडकर यांनी दिला.निवेदनात तक्तमल मार्केटसह सर्व धोकादायक इमारतींचे तात्काळ स्ट्रक्चरल ऑडिट करणे, नागरिकांना सुरक्षित स्थळी स्थलांतरित करणे तसेच अत्यंत जर्जर इमारतींवर निष्कासनाची कठोर कारवाई करावी, अशा प्रमुख मागण्या करण्यात आल्या आहेत. या निवेदनाच्या प्रती शहर अभियंत्यांनाही देण्यात आल्या असून प्रशासनाने २४ तासांत ठोस पावले उचलावीत, अशी मागणी करण्यात आली आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande