
नाशिक, 28 मे (हिं.स.) : किम्स मानवता हॉस्पिटल, नाशिक यांच्या वतीने “वर्ल्ड इमर्जन्सी मेडिसिन डे” निमित्त आयोजित करण्यात आलेली जनजागृतीपर “वॉकथॉन २०२६” आनंदी अंगण जॉगिंग ट्रॅक येथे उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली. आपत्कालीन वैद्यकीय सेवा, सार्वजनिक सुरक्षितता आणि आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांनी घ्यावयाची काळजी याबाबत जनजागृती करण्याच्या उद्देशाने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
या वॉकथॉनमध्ये डॉक्टर, हॉस्पिटल कर्मचारी तसेच स्थानिक नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. कार्यक्रमादरम्यान आपत्कालीन वैद्यकीय सेवेचे महत्त्व आणि आरोग्याविषयी जागरूकता निर्माण करण्यावर विशेष भर देण्यात आला.
यावेळी डॉ. शुभांगी कांबळे यांनी आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांनी कोणती खबरदारी घ्यावी, प्राथमिक उपचारांचे महत्त्व आणि तातडीच्या वैद्यकीय मदतीची आवश्यकता याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले.
तसेच डॉ. मानसी गुजराथी यांनी “Fit to Fat” या विषयावर मार्गदर्शन करत निरोगी जीवनशैली, वाढते लठ्ठपण आणि त्यावरील उपाययोजना याबाबत माहिती दिली. याच प्रसंगी मान्यवरांच्या हस्ते किम्स मानवता हॉस्पिटलच्या “ओबेसिटी क्लिनिक” चे उद्घाटन करण्यात आले.
कार्यक्रमादरम्यान सहभागी नागरिकांना बक्षीस वितरण करण्यात आले. किम्स मानवता हॉस्पिटलच्या आपत्कालीन विभागातील डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांनी आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांनी काय करावे यावर आधारित पथनाट्य सादर केले. तसेच CPR (सीपीआर) चे प्रात्यक्षिक सादर करण्यात आले, ज्यास उपस्थित नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
संगीतमय योगा ग्रुपच्या प्रणेत्या डॉ. मनीषा कापडणीस म्हणाल्या, “नियमित व्यायाम, योग आणि आरोग्याविषयी जागरूकता हीच निरोगी जीवनाची गुरुकिल्ली आहे. अशा सामाजिक जनजागृती उपक्रमांची आजच्या काळात मोठी गरज आहे.”
किम्स मानवता हॉस्पिटलचे सीओओ डॉ. स्वानंद कुलकर्णी यांनी सांगितले की, “आपत्कालीन परिस्थितीत योग्य वेळी योग्य उपचार आणि नागरिकांची जागरूकता अनेक जीव वाचवू शकते. समाजात आपत्कालीन परिस्थितीविषयी जागरूकता निर्माण करणे ही काळाची गरज आहे.”
या कार्यक्रमास डॉ. मनीषा कापडणीस, डॉ. स्वानंद कुलकर्णी, डॉ. रोहन देव, योगा प्रशिक्षक सविता सरडे, माजी नगरसेवक अरुण नाना काळे, माजी नगरसेवक संतोष गायकवाड, रामदास निकम, राजेंद्र धामणे, वैभव काळे, अनिल सुर्वे आदी मान्यवर उपस्थित होते.
“आजची तयारी, उद्याची सुरक्षितता” हा संदेश देत कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला.
--------------------
हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV