इस्रायलला मान्यता दिल्यास सरकार संपवण्याचा इशारा, लष्कर-ए-तैयबाची पाकिस्तानला धमकी
इस्लामाबाद , 28 मे (हिं.स.)।अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अब्राहम करारांतर्गत पाकिस्तानसह अनेक मुस्लिम देशांनी इस्रायलला मान्यता द्यावी, असे आवाहन केले आहे. त्यानंतर दहशतवादी संघटना लष्कर-ए-तैयबा ने पाकिस्तान सरकारला इशारा दिला आहे
इस्रायलला मान्यता दिल्यास सरकार संपवण्याचा इशारा, लष्कर-ए-तैयबाची पाकिस्तानला धमकी


इस्लामाबाद , 28 मे (हिं.स.)।अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अब्राहम करारांतर्गत पाकिस्तानसह अनेक मुस्लिम देशांनी इस्रायलला मान्यता द्यावी, असे आवाहन केले आहे. त्यानंतर दहशतवादी संघटना लष्कर-ए-तैयबा ने पाकिस्तान सरकारला इशारा दिला आहे की, जर इस्रायलला राष्ट्र म्हणून मान्यता देण्याचा विचारही केला, तर सरकारला संपवले जाईल.

लष्कर-ए-तैयबाचा उपप्रमुख सैफुल्लाह कसुरी याने पाकिस्तानचे सर्वोच्च नेतृत्व आणि लष्करातील वरिष्ठ अधिकाऱ्यांना थेट आणि सार्वजनिकपणे जीवे मारण्याची धमकी दिली आहे. एका सभेला संबोधित करताना सैफुल्लाह म्हणाला, “जर पाकिस्तान सरकारने इस्रायलला मान्यता दिली, तर देशातील वातावरण बिघडू शकते. जर असे झाले, तर त्यांना मारले जाईल, उद्ध्वस्त केले जाईल आणि पूर्णपणे नष्ट केले जाईल.”

लष्करचा दहशतवादी सैफुल्लाहने पाकिस्तानच्या सर्वोच्च सत्ताधाऱ्यांना लक्ष्य करत इशारा दिला की, इस्रायलविषयी पाकिस्तानच्या अनेक दशकांपासूनच्या परराष्ट्र धोरणात बदल करण्यासाठी पडद्यामागे कोणतेही प्रयत्न झाले, तर त्याला तीव्र विरोध केला जाईल. ही भडकाऊ टिप्पणी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानसह मुस्लिम देशांना ‘अब्राहम करारा’अंतर्गत इस्रायलशी राजनैतिक संबंध प्रस्थापित करण्याचे आणि त्याला राष्ट्र म्हणून मान्यता देण्याचे आवाहन केल्यानंतर समोर आली आहे.

सैफुल्लाह कसुरी पुढे म्हणाला की, जगातील कोणत्याही महासत्तेकडे इस्लामी देशांना इस्रायलला राष्ट्र म्हणून मान्यता देण्यास भाग पाडण्याइतकी ताकद नाही. पाकिस्तान आणि सौदी अरेबिया यांच्यात मजबूत होत असलेल्या संरक्षण सहकार्याचा उल्लेख करत त्याने दावा केला की, पाकिस्तानच्या लष्करी क्षमतेची रणनीतिक पोहोच आता इतकी वाढली आहे की ती इस्रायलच्या प्रभावाला प्रत्युत्तर देऊ शकते.

पाकिस्तान सरकारला इशारा देणाऱ्या या भडकाऊ भाषणादरम्यान सैफुल्लाहने जिहाद, शहादत आणि पॅलेस्टाईनमधील संघर्षाशी संबंधित अतिशय भडकाऊ घोषणांचा वापर केला. त्याचा उद्देश समर्थकांना भडकावणे आणि सरकारी धोरणांविरोधात विरोध एकत्रित करणे हा होता.“जो कोणी इस्रायलला मान्यता देईल, तो उद्ध्वस्त होईल,” असे सैफुल्लाह म्हणाला. “इंशाअल्लाह, मुस्लिम राष्ट्रांवरील आमचा विश्वास आणि आमची विचारधारा कायम राहील. तुम्ही आमच्यासोबत एक अल्लाहची उपासना करू लागेपर्यंत हा संघर्ष सुरूच राहील.”

दरम्यान, सुरक्षा तज्ज्ञांचे मत आहे की, लष्कर-ए-तैयबाच्या उपप्रमुखाची ही वक्तव्ये पूर्णपणे बनावटी असू शकतात आणि अमेरिकेच्या दबावापासून बचाव करण्यासाठी पाकिस्तानचे लष्करप्रमुख आसिम मुनीर यांची ही एक नियोजित रणनीती असू शकते.

---------------

हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode


 rajesh pande