
लातूर, 28 मे (हिं.स.)।
आज लातूर रेल्वे स्थानक येथे सोलापूर विभागाच्या विभागीय अभियंत्यांनी भेट देत लातूर व परिसरातील विविध रेल्वे विकासकामांची प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी सुरू असलेल्या प्रकल्पांचा आढावा घेऊन प्रलंबित कामे जलदगतीने पूर्ण करण्याबाबत संबंधित अधिकाऱ्यांशी सविस्तर चर्चा करण्यात आली.
लातूर रेल्वे स्थानकावरील पिट लाईन कामाची प्रगती, उर्वरित कामे आणि हरंगुळ येथे प्रस्तावित पिट लाईनच्या व्यवहार्यतेचा आढावा घेण्यात आला. तसेच घरणी क्रॉसिंग स्टेशनची प्रगती, प्रलंबित RUB/ROB कामे, मुरूड रेल्वे स्टेशनचा दर्जा वाढवणे आणि तेथे क्रॉसिंग सुविधा उपलब्ध करून देण्याच्या विषयांवरही चर्चा झाली.
प्रवाशांच्या सुरक्षितता आणि सुविधांना प्राधान्य देत महिला RPF/GRP कर्मचाऱ्यांची उपलब्धता, वातानुकूलित रिटायरिंग रूम व डॉर्मिटरी सुविधा, प्लॅटफॉर्मच्या दोन्ही बाजूंना स्वच्छतागृह व्यवस्था तसेच रेल्वे स्थानक परिसरात स्वतंत्र प्रवेश व निर्गमन गेट उभारण्याची आवश्यकता यावेळी अधोरेखित करण्यात आली.
याशिवाय वृक्षतोडीच्या बदल्यात पर्यावरणपूरक वृक्षारोपण, लिफ्ट सुविधेसह मंजूर फूट ओव्हर ब्रिजचे काम तातडीने पूर्ण करणे, प्लॅटफॉर्म क्रमांक २ चा विस्तार आणि नवीन प्लॅटफॉर्म क्रमांक ३ उभारणीबाबतही सकारात्मक चर्चा झाली.
लातूरच्या रेल्वे पायाभूत सुविधांचा विकास, प्रवाशांच्या सोयीसुविधांमध्ये वाढ आणि भविष्यातील गरजा लक्षात घेऊन संबंधित विभागाकडे सातत्याने पाठपुरावा सुरू असून लातूरच्या रेल्वे विकासासाठी कटिबद्ध असल्याची भूमिका यावेळी मांडण्यात आली.
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis