
पुणे, 28 मे (हिं.स.)मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनावर ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी जोरदार टीका केली आहे. पुण्यात पत्रकार परिषदेत बोलताना हाके म्हणाले की, “मनोज जरांगे पाटील यांचे आंदोलन म्हणजे लोकशाही आणि आरक्षण व्यवस्थेचे ज्ञान नसलेल्या व्यक्तीच्या हातात गेलेला पोरखेळ आहे. सरकारने त्यांच्यासाठी कायम ‘रेड कार्पेट’ अंथरले असून त्यांच्या दबावाखाली काढण्यात आलेले सरकारी नोटिफिकेशन पूर्णपणे बेकायदेशीर आहे. त्यांची मागणी कायद्याच्या कसोटीवर टिकणारी नाही.”
जरांगे पाटील यांच्या नवव्या उपोषणाचाही हाके यांनी उपरोधिक शब्दांत उल्लेख केला. “आधी आठ वेळा उपोषण झाले, आता नववे सुरू आहे. जरांगे पाच पिढ्यांचे नुकसान झाल्याचा दावा करतात, मात्र त्यातून फायदा कुणाचा झाला हे त्यांनी सांगावे,” असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
मराठा समाजातील गरिबीला ओबीसी आरक्षण जबाबदार धरता येणार नाही, असे स्पष्ट करत हाके म्हणाले, “ओबीसींसाठी बजेटमध्ये किती निधी दिला जातो, याचे आत्मपरीक्षण करावे. मराठा समाजाची फसवणूक ओबीसींनी नव्हे तर पुढाऱ्यांनी आणि सहकार क्षेत्रातील नेत्यांनी केली. राज्यातील सहकारी साखर कारखाने बुडण्यामागे कोण जबाबदार आहे, याची उत्तरे त्यांनी द्यावीत.”शासनाच्या भूमिकेवरही लक्ष्मण हाके यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. ते म्हणाले, “सरकारने मनोज जरांगे यांचे अवाजवी लाड केले आहेत. मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळातील सदस्य वारंवार त्यांची भेट घेतात, मात्र ओबीसी समाजाच्या भावना आणि प्रश्नांकडे दुर्लक्ष केले जाते. कोणतेही स्पष्ट निकष न ठरवता शासनाकडून बेकायदेशीररीत्या कुणबी प्रमाणपत्रांचे वाटप सुरू आहे. या संपूर्ण आंदोलनाचा सर्वाधिक फटका ओबीसी समाजाला बसला असून आमच्या अस्तित्वावरच संकट निर्माण झाले आहे.”
---------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु