
पुणे, 28 मे (हिं.स.)।
भोर तालुक्यातील नसरापूर अत्याचार आणि हत्या प्रकरणात मोठी घडामोड समोर आली आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी भीमराव कांबळे (६५ वर्षे) विरोधात न्यायालयाने आरोप निश्चित केले असून, आरोपीविरोधात प्रथमदर्शनी पुरावे असल्याचे निरीक्षण न्यायालयाने नोंदवले आहे. तसेच, या प्रकरणाची सुनावणी आता रोज ‘इन कॅमेरा’ पद्धतीने होणार असल्याची माहिती समोर आली आहे.
या प्रकरणातील आरोपीला प्रथमच प्रत्यक्ष न्यायालयात हजर करण्यात आले. सुनावणी दरम्यान आरोपीच्या वकिलांकडून आरोप निश्चितीला विरोध करण्यात आला. मात्र, तपास यंत्रणांनी सादर केलेल्या पुराव्यांच्या आधारे न्यायालयाने आरोपीवर आरोप निश्चित केले.
घटनेनंतर अवघ्या पंधरा दिवसांत पोलिसांनी दोषारोपपत्र दाखल केले होते. त्याच चार्जशीटवर आज सुनावणी पार पडली. यावेळी लैंगिक चाचणी अहवाल, सीसीटीव्ही फुटेज आणि इतर तांत्रिक पुराव्यांची पुन्हा तपासणी करण्यात आली. तसेच, दोषारोपपत्रातील महत्त्वाची माहिती न्यायालयासमोर मांडण्यात आली. दरम्यान, या गंभीर प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर खटल्याची सुनावणी गोपनीय पद्धतीने म्हणजेच ‘इन कॅमेरा’ पद्धतीने दररोज घेण्याचा निर्णय न्यायालयाने घेतल्याची माहिती समोर आली आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड