
नाशिक, 28 मे (हिं.स.) : नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळा 2027 च्या पार्श्वभूमीवर आपत्ती व्यवस्थापन तयारी आणि आपत्कालीन प्रतिसाद नियोजनाचा आढावा घेण्यासाठी राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने (NDMA) 26 मे रोजी नवी दिल्ली येथे उच्चस्तरीय बैठक आयोजित केली होती. या बैठकीत नाशिक-त्र्यंबकेश्वर कुंभमेळा प्राधिकरणाने सहभाग घेतला.
बैठकीच्या अध्यक्षस्थानी एनडीएमएचे सदस्य तथा विभागप्रमुख डॉ. कृष्णा एस. वत्सा होते. यावेळी प्राधिकरणाचे सदस्य डॉ. दिनेश कुमार असवाल तसेच महाराष्ट्र शासनातील वरिष्ठ अधिकारी आणि विविध विभागांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
राज्य आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन विभागाच्या प्रधान सचिव विनीता वैद सिंघल आणि कुंभमेळा प्राधिकरण आयुक्त शेखर सिंह यांनी कुंभमेळा 2027 साठी सुरू असलेल्या तयारीचा सविस्तर आढावा सादर केला.
बैठकीत चर्चेचे प्रमुख मुद्दे :
आपत्ती संवेदनशीलता व जोखीम मूल्यांकन
गर्दी व्यवस्थापन आणि उच्च दाबाच्या कालावधीचे विश्लेषण
आपत्कालीन प्रतिसाद नियोजन व घटना प्रतिसाद प्रणाली
स्थळ आपत्कालीन नियंत्रण केंद्रांचे कार्यान्वयन
विविध विभागांतील समन्वय यंत्रणा
तसेच रासायनिक, जैविक, किरणोत्सर्गीय आणि अणुस्तरीय (सीबीआरएन) धोके लक्षात घेऊन विशेष तयारी,
राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल (एनडीआरएफ) पथकांची नियुक्ती आणि मोठ्या प्रमाणावरील आपत्कालीन परिस्थितीसाठी मजबूत यंत्रणा उभारण्यावर चर्चा झाली.
कुंभमेळा प्राधिकरणाकडून गर्दी व्यवस्थापन आणि पूर्व अनुभवांवर आधारित कार्यशाळा आयोजित करण्यासाठी तसेच तांत्रिक मार्गदर्शन व धोरणात्मक सहकार्याची मागणी करण्यात आली.
एनडीएमएकडून सिंहस्थ कुंभमेळा 2027 साठी सुरू असलेल्या तयारीबाबत समाधान व्यक्त करण्यात आले असून आवश्यक ते सर्व तांत्रिक व धोरणात्मक सहकार्य देण्याचे आश्वासन देण्यात आले आहे.
भाविकांची मोठी गर्दी अपेक्षित असल्याने सुरक्षितता, आपत्कालीन प्रतिसाद आणि बहुविभागीय समन्वय यंत्रणा अधिक सक्षम करण्यावर विशेष भर देण्यात येणार असल्याचेही बैठकीत नमूद करण्यात आले.
-------------------
हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV