परभणी - ग्रामीण भागातील मासिक पाळीबाबतच्या अंधश्रद्धा दूर करण्याची गरज : आशा चांडक
परभणी, 28 मे (हिं.स.)। ग्रामीण भागात आजही मासिक पाळीबाबत अंधश्रद्धा, गैरसमज आणि चुकीच्या परंपरा मोठ्या प्रमाणावर आढळून येत आहेत. या गैरसमजांचा मुलींच्या शारीरिक व मानसिक आरोग्यावर विपरीत परिणाम होत आहे, त्यामुळे ग्रामीण भागातील मासिक पाळीबाबतच्या
परभणी - ग्रामीण भागातील मासिक पाळीबाबतच्या अंधश्रद्धा दूर करण्याची गरज : आशा चांडक


परभणी, 28 मे (हिं.स.)।

ग्रामीण भागात आजही मासिक पाळीबाबत अंधश्रद्धा, गैरसमज आणि चुकीच्या परंपरा मोठ्या प्रमाणावर आढळून येत आहेत. या गैरसमजांचा मुलींच्या शारीरिक व मानसिक आरोग्यावर विपरीत परिणाम होत आहे, त्यामुळे ग्रामीण भागातील मासिक पाळीबाबतच्या अंधश्रद्धा दूर करण्याची गरज आहे, असे मत मासिक पाळी समुपदेशन तज्ञ डॉ. सौ. आशा चांडक यांनी व्यक्त केले. जागतिक मासिक पाळी स्वच्छता दिनानिमित्त 28 मे रोजी सेलू तालुक्यातील हदगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत ‘मासिक पाळी व्यवस्थापन’ विषयावर मार्गदर्शक कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. या कार्यशाळेला किशोरवयीन मुली, महिला व ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या कार्यक्रमास एचएआरसी संस्थेचे अध्यक्ष डॉ. पवन चांडक, रामराव बोबडे, बाबासाहेब बाबर, पद्माकर गोंडगे, श्रीमती अर्थमवार, मंगल पावडे (पो.पा.), बी. एस. पावडे, रामेश्वर पावडे आदी उपस्थित होते.

यावेळी चांडक यांनी पौगंडावस्थेतील शारीरिक व मानसिक बदल, मासिक पाळीदरम्यान घ्यावयाची स्वच्छतेची काळजी, सॅनिटरी पॅड किंवा स्वच्छ सुती कापडाचा योग्य वापर तसेच त्याची सुरक्षित विल्हेवाट याबाबत त्यांनी सविस्तर माहिती दिली. यासोबतच आयरन व प्रोटीनयुक्त आहाराचे महत्त्व अधोरेखित करत हिरव्या पालेभाज्या, डाळी, खजूर, तीळ-गूळ, दूध व फळांचा आहारात समावेश करण्याचा सल्ला दिला.

पीसीओडी, अतिरक्तस्राव यांसारख्या समस्यांबाबत जागरूकता निर्माण करत पर्यावरणपूरक पर्याय म्हणून मेन्स्ट्रुअल कपची माहितीही त्यांनी उपस्थितांना दिली. तसेच वाढते जंक फूड सेवन, अनियमित जीवनशैली आणि वाढता स्क्रीन टाइम यामुळे हार्मोन्सच्या संतुलनावर परिणाम होऊन मासिक पाळी अनियमित होण्याची शक्यता वाढत असल्याचे त्यांनी नमूद केले. संतुलित आहार, नियमित व्यायाम आणि स्क्रीनचा मर्यादित वापर करण्याचे आवाहनही त्यांनी केले.

यावेळी डॉ. पवन चांडक यांनी संस्थेच्या विविध उपक्रमांचा आढावा घेताना सांगितले की, संस्थेतर्फे आजवर 260 हून अधिक मासिक पाळी व्यवस्थापन कार्यशाळा घेण्यात आल्या असून 22 हजारांपेक्षा अधिक किशोरवयीन मुलींचे समुपदेशन करण्यात आले आहे. तसेच 13 हजारांहून अधिक सॅनिटरी पॅडचे वाटप करण्यात आले असून मेंस्ट्रुअल कप जनजागृती, शिक्षक, माता व महिला गटांचे प्रशिक्षण उपक्रम सातत्याने राबविले जात आहेत.या कार्यशाळेमुळे मुलींमध्ये आरोग्य, स्वच्छता आणि सकारात्मक दृष्टिकोनाबाबत प्रभावी जनजागृती निर्माण झाल्याचे उपस्थितांनी सांगितले.

---------------

हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis


 rajesh pande