
ठाणे, 28 मे (हिं.स.)।
: आयुर्वेद पदवीधरांना आंतरराष्ट्रीय स्तरावर वैद्यकीय व्यवसाय करण्यासाठी कायदेशीर मार्ग उपलब्ध करून देणे तसेच नवीन पिढीतील आयुर्वेद चिकित्सकांना सक्षम बनविण्याच्या उद्देशाने राष्ट्रीय एकात्मिक वैद्यकीय संघटना (निमा) केंद्रीय परिषदेतर्फे “निमा आयुर्वेद संस्थापन एवं प्रसार वैश्विक प्रकल्प” सुरू करण्याचा ठराव मंजूर करण्यात आला आहे. या प्रकल्पाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी चेअरमन म्हणून ज्येष्ठ आयुर्वेद तज्ञ डॉक्टर उदय कुलकर्णी यांचे नेमणूक करण्यात आली आहे.
आयुर्वेद शास्त्र जगभरात पोहोचवण्यासाठी आयुर्वेद शिकणाऱ्या विद्यार्थ्यांची तयारी करून 200 हून अधिक देशांमध्ये आयुर्वेदाचा प्रचार आणि प्रसार व्हावा यासाठी निमा या संस्थेतर्फे विश्व आयुर्वेद सहयोग तयार करण्यात आले आहे. त्याचे चेअरमन म्हणून ही निवड झाल्याचे डॉ. कुलकर्णी यांनी सांगीतले. डॉ. कुलकर्णी यांच्यासह सदस्य म्हणून वाराणसी, उत्तर प्रदेशचे डॉ. राजेश श्रीवास्तव, पुण्याचे डॉ. निलेश लोंढे यांची देखील नियुक्ती करण्यात आली आहे. डॉ. कुलकर्णी हे सॅम ग्लोबल युनिव्हर्सिटीचे एच ओ डी आणि प्राध्यापक आहेत. आयुर्वेद फोरमचे महाराष्ट्र उपाध्यक्ष असून आयुर्वेदिक क्षेत्रात ते ३३ वर्ष कार्यरत आहेत. वेदना व्यवस्थापन, पंचकर्म, जीर्ण विकार यावर यशस्वी संशोधनात्मक कार्य केलेले आहे. ठाण्यात आयुर्वेदाचे पहिले हॉस्पिटल सुरू करणारे ते एकमेव आयुर्वेदाचार्य आहेत. महाराष्ट्र आयुर्वेद हॉस्पिटलचे ते अध्यक्ष आहेत.
---------------
हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर