
अमरावती, 28 मे (हिं.स.)।अमरावती अपर आयुक्तालयाच्या हद्दीतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या बदल्यांची प्रक्रिया ऑनलाइन राबविल्या गेली. पहिल्या टप्प्यात शिक्षकेतर अशा ८९ जणांना त्यांनी नवीन दिलेल्या ठिकाणी रुजू व्हावे, असे आदेश देण्यात आले. २०२६ मध्ये शिक्षक व शिक्षकेतर गटातील १७३ जण बदलीसाठी पात्र होते. दरवर्षी इनकॅमेरा ही बदलीप्रक्रिया राबविण्यात येत होती. त्यासाठी दोन ते दिन दिवसांचा कालावधी जात होता. शिवाय औरंगाबाद जिल्ह्यापासूनचे कर्मचारी व अधिकाऱ्यांना नव्या बदलीचे स्थान मिळावे म्हणून समुपदेशनाकरिता अपर आयुक्तालय, अमरावती येथे बोलविण्यात येत होते. त्यात त्यांना वेळ आणि प्रवासाचा त्रास सहन करावा लागत होता. त्यामुळे अनेकांना मनस्ताप सहन करावा लागायचा. यापूर्वी बदलीप्राप्त लोकांच्या मुलाखती या इनकॅमेरा होत होत्या. यावेळी पहिल्यांदाच बदलीसाठी सात प्रकल्प कार्यालयातील जे १७३ शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी प्राप्त होते. त्यांना एटीसी कार्यालयातून एक लिंक देण्यात आली होती. त्यावर त्यांना जॉइन होण्यास सांगितले. बुधवारी (ता. २७) शिक्षकेतर कर्मचारी, कनिष्ठ लिपीक, गृहपाल, महिला व पुरुष अधीक्षक, अधीक्षिका या गटांचा समावेश होता. जे पर्याय उपलब्ध आहेत, त्याठिकाणी रुजू व्हावे, असे आदेशही देण्यात आले. अमरावतीच्या एटीसी आयुषी सिंह व उपायुक्त श्रीकांत धोटे यांनी संवाद साधून समुपदेशन केले. उर्वरित ८४ शिक्षक व इतर प्रवर्गाच्या मुलाखती या उद्या शुक्रवारी (ता. २९) ऑनलाइन पद्धतीनेच केल्या जाणार आहे. शुक्रवारी होणाऱ्या बदलीप्राप्त शिक्षकांचे ऑनलाइन समुपदेशन कसे होते, याकडे लक्ष लागून आहे.
बदलीप्राप्त शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी सुचविलेले पर्याय आणि उपलब्ध परिस्थिती, याचा सारासार विचार करूनच नवीन ठिकाणी बदलीवर पाठविल्या जाते. त्यात पारदर्शकता ही अग्रभागी आहे. -आयुषी सिंह, अपर आयुक्त, आदिवासी विकास विभाग, अमरावती.
---------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी