

नाशिक, 28 मे (हिं.स.) : सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर उभारण्यात येत असलेल्या रिंग रोड प्रकल्पामुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांनी गुरुवारी रामकुंड येथे नाशिकचे प्रांत अधिकारी पवन दत्ता यांचे प्रतीकात्मक श्राद्ध घालण्याचा कार्यक्रम आयोजित केला होता. मात्र, पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करत हा कार्यक्रम थांबवला. यावेळी आंदोलक आणि पोलिसांमध्ये काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले.
सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी शहरालगत रिंग रोड उभारण्याचे काम सुरू असून, या प्रकल्पासाठी दरी, मातोरी आणि मखमलाबाद परिसरातील जमिनी ताब्यात घेण्याची प्रक्रिया सुरू आहे. याला स्थानिक शेतकरी आणि नागरिकांकडून तीव्र विरोध केला जात आहे. काही दिवसांपूर्वी जमीन संपादन प्रक्रियेदरम्यान महिलांना मारहाण झाल्याचा आरोप आंदोलकांनी प्रशासनावर केला होता.
या घटनेच्या निषेधार्थ आणि संबंधित अधिकाऱ्यांविरोधात रोष व्यक्त करण्यासाठी प्रांत अधिकारी पवन दत्ता यांचे प्रतीकात्मक श्राद्ध घालण्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. दरम्यान, बाधित शेतकऱ्यांनी बुधवारीपासून गोदावरी नदी किनारी रामकुंड येथे आमरण उपोषण सुरू केले आहे.
श्राद्ध विधीचा कार्यक्रम सुरू होताच सहाय्यक पोलीस आयुक्त देशमुख, पंचवटी पोलीस ठाण्याचे निरीक्षक गजेंद्र पाटील आणि त्यांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी संबंधित गुरुजींशी चर्चा करून कार्यक्रम थांबवला. तसेच आंदोलनाचे प्रमुख साहेबराव दातीर आणि इतर आंदोलकांना ताब्यात घेण्याचा प्रयत्न करण्यात आला. यामुळे काही काळ गोंधळ आणि संघर्षाची परिस्थिती निर्माण झाली.
काही आंदोलक घटनास्थळावरून निघून गेले, तर काहींनी उपोषणस्थळी ठिय्या दिला. पोलिसांनी आंदोलन दडपण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप करत साहेबराव दातीर आणि इतर उपोषणकर्त्यांनी प्रशासनाचा निषेध केला.
दरम्यान, पोलिसांच्या कारवाईनंतरही आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्धार आंदोलकांनी व्यक्त केला असून, शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर घेराव आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली आहे.------------------
हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV