
पुणे, 28 मे (हिं.स.) : स्वातंत्र्यवीर सावरकर फाउंडेशन आणि विश्व हिंदू जागृती फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने पुण्यातील सारसबाग येथे स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन कार्यक्रम उत्साहात पार पडला. यावेळी सावरकरांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
कार्यक्रमास हिंदुत्ववादी नेते मिलिंद एकबोटे आणि सीए सर्वेश मेहेंदळे यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच स्वातंत्र्यवीर सावरकर फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष प्रितम थोरवे, सचिव नयन ठाकूर, विश्वस्त ऍड. श्रीराम जोशी, अमरनाथ देवळालीकर, आर्य नयन ठाकूर, विश्व हिंदू जागृती फाउंडेशनच्या विश्वस्त मुक्तीका वाटखेडकर यांच्यासह मोठ्या संख्येने सावरकरप्रेमी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी उपस्थित मान्यवरांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या राष्ट्रभक्ती, हिंदुत्व विचारधारा आणि सामाजिक कार्याचा गौरवपूर्ण उल्लेख केला. तरुण पिढीने सावरकरांचे विचार आत्मसात करून राष्ट्रहितासाठी कार्य करावे, असे आवाहनही करण्यात आले.
हिंदू समाजाने सामाजिक, सांस्कृतिक आणि वैचारिक स्तरावर एकत्र येण्याची गरज असल्याचे सांगताना मिलिंद एकबोटे यांनी हिंदू जनजागृती आणि संघटनावर भर दिला. त्यांच्या भाषणाला उपस्थितांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
दरम्यान, स्वातंत्र्यवीर सावरकर यांना देशाचा सर्वोच्च नागरी सन्मान ‘भारतरत्न’ प्रदान करण्यात यावा, यासाठी भारत सरकार आणि महाराष्ट्र शासनाकडे सातत्याने पाठपुरावा करण्यात येणार असल्याची घोषणा कार्यक्रमात करण्यात आली. मिलिंद एकबोटे यांच्या नेतृत्वाखाली ही मागणी पुढे नेण्यात येणार असल्याचे आयोजकांनी सांगितले.
पुढील वर्षी ‘भारतरत्न स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर’ असा गौरवपूर्ण उल्लेख करण्याचा विश्वासही यावेळी व्यक्त करण्यात आला. उपस्थित सावरकरप्रेमींनी या भूमिकेला उत्स्फूर्त समर्थन दिले.
---------------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु