
सोलापूर, 28 मे (हिं.स.)।
जिल्ह्यातील जानेवारी-फेब्रुवारी २०२६ मध्ये मुदत संपलेल्या सुमारे ६५० ग्रामपंचायतींच्या निवडणुकांची प्रक्रिया आता वेग घेऊ लागली आहे. राज्य सरकारच्या आदेशानुसार सध्या या ग्रामपंचायतींवर मावळते सरपंच प्रशासक म्हणून काम पाहत आहेत. ग्रामपंचायतींची अंतिम प्रभागरचना ४ मे रोजी जाहीर झाली असून सरपंच आरक्षण प्रक्रियाही पूर्ण झाली आहे. आता मतदार याद्या अंतिम करण्याची प्रक्रिया हाती घेतली जाणार आहे.
विश्वसनीय सूत्रांच्या माहितीनुसार, नोव्हेंबरमध्ये अंतिम मतदार याद्या प्रसिद्ध झाल्यानंतर नोव्हेंबरअखेरीस मतदान होण्याची शक्यता आहे.राज्य सरकारच्या ग्रामविकास विभागाने १७ फेब्रुवारी रोजी ग्रामपंचायतींच्या प्रभागरचनेचा कार्यक्रम जाहीर केला होता. त्यानुसार ३० मार्चपर्यंत प्रारूप प्रभागरचना तयार करण्यात आली. त्यावर हरकती आणि सूचना नोंदविण्यासाठी १३ एप्रिलपर्यंत मुदत देण्यात आली होती. त्यानंतर प्राप्त हरकतींवर सुनावणी घेऊन ४ मे रोजी अंतिम प्रभागरचना प्रसिद्ध करण्यात आली.दरम्यान, निवडणुकीपूर्वी मतदार याद्या अंतिम करण्यासाठी मतदार पुनरीक्षण कार्यक्रम राबविला जाणार आहे. ३० जून ते २९ जुलैदरम्यान बूथ लेव्हल ऑफिसर (बीएलओ) घरोघरी जाऊन मतदारांची माहिती संकलित करणार आहेत.५ ऑगस्ट रोजी प्रारूप मतदार याद्या प्रसिद्ध होतील. त्यानंतर ४ सप्टेंबरपर्यंत हरकती व दावे दाखल करता येणार आहेत. या हरकतींचा निपटारा ३ सप्टेंबरपर्यंत करण्यात येईल. अखेर ७ नोव्हेंबर रोजी अंतिम मतदार याद्या जाहीर केल्या जाणार असून, त्याच याद्यांच्या आधारे मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींच्या निवडणुका पार पडतील.
जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतींचे सरपंच थेट जनतेतून निवडले जाणार असल्याने निवडणुकांकडे ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड