
सोलापूर, 28 मे (हिं.स.)। सोलापूर शहर वाहतूक शाखेकडे ६० ई-चालान मशिन्स उपलब्ध असतानाही काही वाहतूक अंमलदार खासगी मोबाईलवर वाहनांचे फोटो काढून वाहनधारकांकडून रोखीने दंड वसूल करत असल्याच्या तक्रारी पुढे येत आहेत. अनेक प्रकरणांत दंडाची अधिकृत पावती दिली जात नसल्याने वाहतूक कारवाईच्या पारदर्शकतेवर प्रश्न उपस्थित होत असून वाहनधारकांमध्ये नाराजीचे वातावरण आहे.
सोलापूर शहरात दररोज लाखो वाहनांची वर्दळ असते. वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनधारकांवर शिस्त लागावी आणि अपघातांचे प्रमाण कमी व्हावे यासाठी वाहतूक पोलिसांकडून नियमित दंडात्मक कारवाई केली जाते. या मोहिमेमुळे काही प्रमाणात वाहतुकीत शिस्त निर्माण झाली असल्याचेही मानले जाते.
मात्र, काही वाहतूक अंमलदार नियमभंग करणाऱ्या वाहनचालकांकडून थेट रोख रक्कम घेत असल्याच्या तक्रारी समोर येत आहेत. विशेष म्हणजे, या रकमेची अधिकृत पावती न दिल्याने कारवाई प्रक्रियेबाबत संशय निर्माण होत आहे. काही कर्मचाऱ्यांच्या अशा वर्तनामुळे संपूर्ण वाहतूक विभागाची प्रतिमा मलिन होत असल्याची भावना नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.
या प्रकाराची वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी गांभीर्याने दखल घेऊन चौकशी करावी आणि कारवाई प्रक्रियेत अधिक पारदर्शकता आणावी, अशी मागणी सामान्य नागरिकांकडून होत आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड