
ढाका , 28 मे (हिं.स.)।बांग्लादेशमध्ये ‘डोनाल्ड ट्रम्प’ नावाने चर्चेत असलेल्या दुर्मिळ अल्बिनो म्हशीची आता कुर्बानी दिली जाणार नाही. बांग्लादेशातील रहमान सरकारच्या हस्तक्षेपानंतर पोलिसांनी या म्हशीला ताब्यात घेतले आहे. आता या म्हशीला ढाका येथील राष्ट्रीय प्राणीसंग्रहालयात ठेवण्यात येणार आहे.
अलिकडच्या काही दिवसांत ही म्हैस चर्चेत आल्यानंतर सोशल मीडियावर तिची मोठी क्रेझ पाहायला मिळाली. या म्हशीच्या डोक्यावरचे सोनेरी केस अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या हेअरस्टाइलसारखे दिसतात.
पोलिसांनी सांगितले की, ७०० किलो वजनाची ही म्हैस सरकारी निर्देशानंतर अधिकृत संरक्षणाखाली घेण्यात आली. काही तासांनंतर गुरुवारी बकरी ईदच्या निमित्ताने तिची कुर्बानी दिली जाणार होती.
म्हशीचे मालक मनीरुज जमान यांनी सांगितले की, बुधवारी दुपारी पोलिस त्यांच्या घरी आले आणि सरकारने ही म्हैस आपल्या संरक्षणाखाली घेण्याचा निर्णय घेतल्याचे सांगितले. “आम्हाला कोणत्याही प्रकारचा संघर्ष नको असल्याने आम्ही ही म्हैस पोलिसांच्या ताब्यात दिली,” असे त्यांनी म्हटले.
जमान यांनी सांगितले की, अधिकाऱ्यांनी त्यांना म्हशीच्या बदल्यात नुकसानभरपाई किंवा दुसरे जनावर देण्याचे आश्वासन दिले आहे.
किरानीगंज पोलिस ठाण्याचे प्रभारी रुहुल कुद्दूस यांनी सांगितले की, पशुसंवर्धन विभागाच्या अधिकाऱ्यांचे मत आहे की ही म्हैस अजून तरुण असून तिला आणखी अनेक वर्षे वाढवता येऊ शकते.राष्ट्रीय प्राणीसंग्रहालयाचे क्युरेटर अतिकुर रहमान यांनी सांगितले की, या म्हशीची योग्य काळजी घेतली जाईल. तिच्यासाठी स्वतंत्र शेड आणि देखभालीसाठी विशेष कर्मचारीही नियुक्त करण्यात आला आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode