
ठाणे, 28 मे (हिं.स.) भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी स्थापन केलेल्या समता सैनिक दलाच्या शतकोत्तर वाटचालीचा ऐतिहासिक टप्पा पूर्ण होत असून “शतक महोत्सवी अधिवेशन २०२६” चे आयोजन रविवार,दिनांक ३१ मे, २०२६ रोजी सकाळी ९ वाजता ठाणे येथे करण्यात आले आहे. सामाजिक परिवर्तन, समता, बंधुता आणि संविधान मूल्यांचा जागर करण्यासाठी आयोजित करण्यात आलेले हे अधिवेशन राज्यभरातील आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते, अभ्यासक आणि युवकांसाठी प्रेरणादायी ठरणार आहे.
समता सैनिक दलाचे हे भव्य अधिवेशन ठाण्यातील राम गणेश गडकरी रंगायतन नाट्यगृह, तलावपाळी येथे पार पडणार असून महाराष्ट्र राज्य समता सैनिक दलाच्या वतीने या अधिवेशनाचे आयोजन करण्यात आले आहे. अधिवेशनात विविध सामाजिक, शैक्षणिक व प्रबोधनपर कार्यक्रमांची रेलचेल पाहायला मिळणार आहे.
यां संपूर्ण अधिवेशनात विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून उद्घाटन समारंभ, भीमगीते, व्याख्यानमाला, मुक्त संवाद, वर्धापन दिन विशेषांक प्रकाशन, सत्कार समारंभ, ठराव वाचन तसेच सामाजिक बांधिलकी जपणारे विविध उपक्रम आयोजित करण्यात आले आहेत.
यावेळी राज्यभरातील समता सैनिक दलाचे पदाधिकारी, आंबेडकरी चळवळीतील मान्यवर, युवक-युवती आणि सामाजिक कार्यकर्त्यांची मोठ्या प्रमाणावर उपस्थित राहणार आहेत. “समता, न्याय आणि मानवतेच्या विचारांचा वारसा पुढे नेण्यासाठी युवकांनी संघटित होण्याची गरज आहे,” असा संदेश या अधिवेशनातून दिला जाणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली आहे.
समाजातील वंचित, पीडित आणि शोषित घटकांच्या हक्कांसाठी लढणाऱ्या समता सैनिक दलाच्या शतकमहोत्सवी पर्वामुळे ठाणे शहरात आंबेडकरी विचारांचे उत्साहपूर्ण वातावरण निर्माण झाले आहे. हे अधिवेशन सामाजिक परिवर्तनाच्या नव्या पर्वाची दिशा ठरवणारे ठरेल, अशी भावना कार्यकर्त्यांकडून व्यक्त होत आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर