
नांदेड, 28 मे (हिं.स.)
शिवसेना नेते खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी
मराठवाड्यात सुरू असलेल्या ‘शिवसंवाद दौऱ्या’च्या निमित्ताने नांदेड जिल्ह्यातील नायगाव, मुखेड आणि देगलूर विधानसभा मतदारसंघांतील शिवसेना, युवासेना, महिला आघाडी तसेच स्थानिक पदाधिकारी आणि शिवसैनिकांसोबत सविस्तर आढावा बैठक पार पडली. आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर संघटनात्मक बांधणी, बूथनिहाय नियोजन, ग्रामीण भागातील पक्ष विस्तार आणि जनसंपर्क अभियान या विषयांवर यावेळी सखोल चर्चा करण्यात आली. प्रत्येक गाव, वाडी आणि घराघरापर्यंत शिवसेनेचा विचार पोहोचवण्यासाठी कार्यकर्त्यांनी अधिक जोमाने मैदानात उतरावे, जनतेमध्ये सातत्याने संपर्क ठेवावा आणि स्थानिक प्रश्नांवर तत्काळ पाठपुरावा करावा, अशा सूचना यावेळी करण्यात आल्या.
“शिवसेना केवळ पक्ष नाही, तर सामान्य माणसाच्या हक्कासाठी लढणारी ताकद आहे. ही ताकद आणखी मजबूत करायची असेल, तर प्रत्येक शिवसैनिकाने पूर्ण क्षमतेने आणि प्रामाणिकपणे कामाला लागणे गरजेचे आहे,” असे आवाहन यावेळी करण्यात आले. तसेच एसआयआर मोहिमेअंतर्गत मतदार यादी अद्ययावत ठेवणे, नवीन मतदार नोंदणी, युवा मतदार आणि लाभार्थ्यांशी थेट संपर्क वाढवणे, तसेच प्रत्येक बूथवर संघटनेची ताकद वाढवणे यावर विशेष भर देण्यात आला. बीएलए, शाखाप्रमुख आणि पदाधिकाऱ्यांनी बूथस्तरावर अधिक सक्रिय राहून संघटन मजबूत करण्याच्या दृष्टीने काम करण्याच्या सूचनाही यावेळी देण्यात आल्या. आगामी निवडणुकांमध्ये विजय मिळवायचा असेल, तर सर्वांनी पूर्णपणे झोकून देऊन काम करणे फार महत्वाचे असल्याचे मत यावेळी व्यक्त करत सर्वांनी पक्षबांधणीसाठी जोमाने काम करण्याचे आवाहन केले.
यावेळी मंत्री प्रकाश आबिटकर, आमदार हेमंत पाटील, बालाजी कल्याणकर, आनंदराव बोंढारकर, शिवसेना सचिव भाऊसाहेब चौधरी, नांदेड लोकसभा संपर्कप्रमुख रमाकांत मढवी, माजी खासदार आनंद परांजपे, युवासेनेचे रुपेश कदम यांच्यासह स्थानिक जिल्हाप्रमुख, तालुकाप्रमुख, विभागप्रमुख, शाखाप्रमुख, महिला आघाडी, स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis