
छत्रपती संभाजीनगर, 28 मे (हिं.स.)।
शिवसेना नेते खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांचा मराठवाड्यात शिवसंवाद दौरा सुरू झाला. जालना, भोकरदन आणि बदनापूर विधानसभा आढावा बैठक त्यांनी घेतली.
‘शिवसंवाद दौऱ्या’ अंतर्गत जालना येथे जालना, भोकरदन आणि बदनापूर विधानसभा मतदारसंघातील शिवसेना, युवासेना, महिला आघाडी तसेच स्थानिक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांसोबत महत्त्वपूर्ण आढावा बैठक पार पडली. आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर संघटनात्मक बांधणी, बूथनिहाय नियोजन आणि निवडणूक तयारीचा सखोल आढावा यावेळी घेण्यात आला. प्रत्येक गाव, गण आणि गटामध्ये शिवसेनेची ताकद अधिक मजबूत करण्यासाठी स्थानिक पातळीवर प्रभावी संपर्क आणि सक्रिय संघटन उभारणीवर भर देण्यात आला. बूथ स्तरावरील यंत्रणा सक्षम करणे, मतदार यादी पडताळणी, नवीन मतदार नोंदणी तसेच जनसंपर्क मोहिमेला अधिक गती देण्यासाठी बीएलएंनी जबाबदारीने काम करावे, अशा सूचना यावेळी करण्यात आल्या. बैठकीदरम्यान स्थानिक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी थेट संवाद साधत त्यांच्या सूचना, अडचणी आणि अपेक्षा जाणून घेत पुढील वाटचालीबाबत महत्त्वपूर्ण चर्चा करण्यात आली.
यावेळी शहरातील डॉक्टर, वकील, शेतकरी तसेच व्यावसायिक मंडळींनी भेट घेतली. यावेळी या सर्व मंडळींना जाणवणाऱ्या विविध समस्या त्याबाबत निराकरण करण्यासाठी येणाऱ्या अडचणी, प्रशासनाशी समन्वयाचा अभाव याबाबत संवाद साधला. शेतकऱ्यांनी देखील त्यांच्या समस्या बाबत संवाद साधला. सर्वांशी विस्तृत संवाद साधून त्यांच्या समस्या मार्गी कशा लागतील याबाबत सकारात्मक निर्णय घेतला जाईल, असे त्यांना आश्वस्त केले.
यावेळी मंत्री संजय शिरसाट, खासदार संदीपान भुमरे, आमदार अब्दुल सत्तार, अर्जुन खोतकर, शिवसेना सचिव भाऊसाहेब चौधरी, माजी खासदार आनंद परांजपे यांच्यासह शिवसेना, युवासेना स्थानिक जिल्हाप्रमुख, तालुकाप्रमुख, विभागप्रमुख, शाखा प्रमुख, महिला आघाडी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis