
सोलापूर, 28 मे (हिं.स.) : सोलापूर जिल्ह्यातील दहावी-बारावी उत्तीर्ण विद्यार्थी तसेच पदवीधर युवक-युवतींसाठी पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या पुढाकारातून रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात येत आहे. या मेळाव्यासाठी नावनोंदणी प्रक्रिया सुरू झाली असून, मेळाव्याची तारीख आणि वेळ लवकरच जाहीर करण्यात येणार आहे.
जिल्ह्यातील बेरोजगार तरुणांना नामांकित कंपन्यांमध्ये रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात येत आहे. दहावी, बारावी उत्तीर्ण, आयटीआय, डिप्लोमा धारक, कोणत्याही शाखेतील पदवीधर तसेच अनुभवी आणि फ्रेशर उमेदवारांना या रोजगार मेळाव्यात सहभागी होता येणार असल्याची माहिती ग्रामीण पोलिस प्रशासनाने दिली.
या मेळाव्यात खासगी कंपन्या, बँका, निमशासकीय संस्था तसेच विविध खासगी क्षेत्रांतील रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत. त्यामुळे युवक-युवतींना त्यांच्या पात्रतेनुसार रोजगार मिळण्यास मदत होणार असून, कौशल्य विकासालाही चालना मिळेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे.
पोलिस प्रशासनाने सांगितले की, आर्थिक अडचणींमुळे चुकीच्या मार्गाकडे वळणाऱ्या तरुणांसाठी हा रोजगार मेळावा महत्त्वपूर्ण ठरणार आहे. रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देत युवकांना सकारात्मक दिशा देण्याचा प्रयत्न या माध्यमातून केला जात आहे.
दरम्यान, जिल्ह्यातील अधिकाधिक युवक-युवतींनी या रोजगार मेळाव्यात सहभागी होऊन संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन पोलिस प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
-------------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड