
परभणी, 28 मे, (हिं.स.) अधिकमासाच्या पवित्र महिन्यात विविध तीर्थक्षेत्रांकडे जाणार्या भाविकांची वाढती संख्या लक्षात घेऊन राज्य मार्ग परिवहन महामंडळाने सुरू केलेल्या ‘एसटी संगे तीर्थाटन’ योजनेला चांगला प्रतिसाद मिळत आहे. या योजनेंतर्गत महिला, मुले आणि ज्येष्ठ नागरिकांना तिकीट दरात 50 टक्के सवलत देण्यात येत असून, 75 वर्षांवरील नागरिकांना मोफत प्रवासाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. जिंतूर आगाराने भाविकांची गैरसोय टाळण्यासाठी विशेष वेळापत्रक आखले असून, तीर्थक्षेत्रांकडे जाणार्या मार्गांवर अतिरिक्त बससेवाही उपलब्ध करून देण्यात येत आहे.
अधिकमासात देवदर्शनासाठी मोठ्या प्रमाणावर भाविक प्रवास करत असल्याने एसटी महामंडळाने विशेष नियोजन केले आहे. खासगी वाहनांच्या तुलनेत सुरक्षित, सोयीस्कर आणि किफायतशीर प्रवास उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने ही योजना राबविण्यात येत आहे. ‘एसटी संगे तीर्थाटन’ योजनेंतर्गत महिला मंडळे, भजनी मंडळे, बचतगट, ज्येष्ठ नागरिकांचे गट तसेच किमान 40 प्रवाशांचा समूह एकत्र येऊन एसटी बस आरक्षित करू शकतो. संबंधित गटाने मागणी केल्यानंतर त्यांना इच्छित मार्गावर बस उपलब्ध करून दिली जाते. त्यामुळे भाविकांना थेट गावातूनच तीर्थक्षेत्रांपर्यंत प्रवास करणे सुलभ झाले आहे. जिंतूर आगाराने भाविकांची गैरसोय टाळण्यासाठी विशेष वेळापत्रक आखले असून, तीर्थक्षेत्रांकडे जाणार्या मार्गांवर अतिरिक्त बससेवाही उपलब्ध करून देण्यात येत आहे. 40 जणांचा गट तयार झाल्यास स्वतंत्र बसची सुविधा दिली जात असल्याची माहिती स्थानिक प्रशासनाने दिली. अधिकमासातील भाविकांची वाढती गर्दी लक्षात घेता एसटी प्रशासन पूर्णपणे सज्ज असून प्रवाशांना सुरक्षित सेवा देण्यासाठी सर्व उपाययोजना करण्यात आल्याची माहिती आगार प्रमुख आनंद चव्हाण, स्थानक प्रमुख रामेश्वर सोनवणे आणि वाहतूक निरीक्षक शरद पाटील यांनी दिली.
---------------
हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis