
बीड, 28 मे (हिं.स.)।वडवणी तालुक्यात अचानक आलेल्या जोरदार चक्रीवादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाने मोठा कहर केला. अनेक ठिकाणी मोठमोठी झाडे मुळासकट उन्मळून पडली, घरांवरील व गोठ्यावरील पत्रे उडून गेली, तर विद्युत खांब कोसळल्याने वीजपुरवठाही खंडित झाला आहे.
वादळी वाऱ्याचा वेग इतका प्रचंड होता की आंबा, चिंच, जांभूळ यांसारखी अनेक वर्षांची मोठी झाडे मुळासकट कोसळली. त्यामुळे काही प्रमुख र रस्त्यांवर वाहतूक ठप्प झाली होती. अनेक घरांचे पत्रे उडाले, झाडे उन्मळून पडली, शेतकऱ्यांच्या शेतातील झाडांचे तसेच पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. काही ठिकाणी जनावरे जखमी झाल्याच्या घटनाही घडल्या असून अनेक कुटुंबांचे संसार अक्षरशः उघड्यावर आले आहेत.
प्रशासनाने तातडीने मदतकार्य सुरू करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. दरम्यान, नुकसानग्रस्त शेतकरी व नागरिकांना शासनाने
तात्काळ मदत द्यावी, पंचनामे करून आर्थिक नुकसान भरपाई जाहीर करावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने तहसीलदार वडवणी यांना निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. यावेळी तालुकाध्यक्ष महादेव जमाले पाटील, माजी जिल्हा संघटक अॅड. भास्कर उजगरे, खलील पठाण, सुरेश सावंत पाटील, दीपक उजगरे, आच्युत राठोड, हानुमंत राठोड, कल्याण शेंडगे, भास्कर गायकवाड आदी उपस्थित होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis