नांदेडमध्ये अखंड शिवनाम सप्ताह उत्साहात सुरू, चार राज्यांतून दररोज हजारो शिवभक्तांची उपस्थिती
नांदेड, 28 मे (हिं.स.)। धर्माबाद येथून जवळच असलेल्या गोदावरी तटावरील विळेगाव महादेव मंदिर थडी येथे सुरू असलेला अखंड शिवनाम सप्ताह भक्तिमय वातावरणात आणि मोठ्या उत्साहात सुरू आहे. आंध्रप्रदेश, महाराष्ट्र, कर्नाटक व तेलंगणा या चार राज्यांतून दररोज
नांदेडमध्ये अखंड शिवनाम सप्ताह उत्साहात सुरू, चार राज्यांतून दररोज हजारो शिवभक्तांची उपस्थिती


नांदेड, 28 मे (हिं.स.)।

धर्माबाद येथून जवळच असलेल्या गोदावरी तटावरील विळेगाव महादेव मंदिर थडी येथे सुरू असलेला अखंड शिवनाम सप्ताह भक्तिमय वातावरणात आणि मोठ्या उत्साहात सुरू आहे. आंध्रप्रदेश, महाराष्ट्र, कर्नाटक व तेलंगणा या चार राज्यांतून दररोज हजारो शिवभक्त या सप्ताहासाठी उपस्थित राहत असून परिसरात शिवहर नामाचा अखंड जयघोष घुमत आहे.

या भव्य धार्मिक सोहळ्यासाठी महाराष्ट्रासह विविध राज्यांतील नामवंत शिवाचार्य उपस्थित राहून आपल्या अमृतमय प्रवचनातून भाविकांना अध्यात्म, समाजप्रबोधन आणि संस्कारांचे संदेश देत आहेत. भव्य दिव्य व्यासपीठावर आयोजित धर्मसभेमुळे भक्तिमय वातावरणाची अनुभूती भाविकांना मिळत आहे.

सप्ताहाच्या निमित्ताने हजारो शिवभक्तांसाठी दररोज तीन वेळा महाप्रसादाचे भव्य आयोजन करण्यात आले असून, भाविक मोठ्या श्रद्धेने त्याचा लाभ घेत आहेत. दैनंदिन कार्यक्रमांमध्ये धार्मिक उपदेशासोबतच समाजप्रबोधन, मानवता, बंधुभाव आणि विश्वशांतीचा संदेशही दिला जात आहे.

दरम्यान, अवकाळी पाऊस आणि वादळी वाऱ्याने परिसरात रौद्ररूप धारण केले होते. मात्र, निसर्गाच्या या संकटानंतरही कुठलाही अनर्थ न घडता अखंड शिवनाम सप्ताह निर्विघ्नपणे आणि उत्साहात सुरू असल्याने भाविकांनी याला शंभू महादेवाची कृपा असल्याची भावना व्यक्त केली. सप्ताहाच्या शेवटच्या दिवशी प्रचंड संख्येने शिवभक्त उपस्थित राहण्याची शक्यता लक्षात घेऊन सप्ताह समितीच्या वतीने व्यापक आणि भव्य नियोजन करण्यात आले असून, सुरक्षा, महाप्रसाद व भाविकांच्या सुविधांवर विशेष भर देण्यात आला आहे. त्यामुळे अंतिम दिवसाचा सोहळा अधिक भव्यदिव्य वातावरणात पार पडणार असल्याची माहिती आयोजकांकडून देण्यात आली.

---------------

हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis


 rajesh pande