
अमरावती, 28 मे (हिं.स.)।
जिल्ह्यात महाविद्यालयांकडून दाखविण्यात आलेल्या अनास्थेमुळे हजारो विद्यार्थ्यांचे शिष्यवृत्तीचे अर्ज प्रलंबित असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. महाविद्यालय स्तरावर २३३२ तर विद्यार्थी स्तरावर १९४२ अर्ज प्रलंबित असल्याची माहिती आहे. महाडीबीटी डॅशबोर्डानुसार अद्यापही २०१९-२० ते २०२५-२६ या वर्षातील महाविद्यालयांमधील विद्यार्थ्यांचे शिष्यवृत्तीचे अर्ज प्रलंबित आहेत. महाविद्यालयांनी शिष्यवृत्तीचे अर्ज विहीत मुदतीत जिल्हा कार्यालयांकडे पाठविणे अपेक्षित असताना जिल्ह्यातील अनेक महाविद्यालयांनी ही बाब गंभीरपणे घेतली नाही. अर्ज मंजुरीकरिता ते समाजकल्याणच्या सहायक आयुक्तांकडे सादर करण्याची सूचना वेळोवेळी देण्यात आल्यानंतर सुद्धा महाविद्यालयांनी त्याकडे पाठ फिरविली. ही बाब अतिशय गंभीर असल्याचे सहायक आयुक्त राजेंद्र जाधवर यांनी सांगितले. याशिवाय महाविद्यालय स्तरावर प्रलंबित असलेले पात्र अर्ज ३१ मेपर्यंत जिल्हा लॉगीनवर पाठविण्यात यावे तसेच विद्यार्थ्यांच्या लॅागीनकडे त्रुटी पूर्ततेकरिता परत केलेल्या अर्जांची त्रुटीपूर्तता त्वरित करावी, असे निर्देश महाविद्यालयांना देण्यात आले आहेत. विद्यार्थी शिष्यवृत्तीपासून वंचित राहिल्यास त्याची जबाबदारी सर्वस्वी प्राचार्यांची राहील, असेही समाजकल्याणचे सहायक आयुक्त राजेंद्र जाधवर यांनी स्पष्ट केले.
---------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी