नागपुरात वृक्ष संवर्धनासाठी डॉ. दंदे फाउंडेशनचा पुढाकार
नितीन गडकरींच्या उपस्थितीत ‘एक पेड नाती के नाम’ उपक्रमाचा शुभारंभ नागपूर, 28 मे (हिं.स.) : नागपुरातील वाढते आणि जीवघेणे तापमान लक्षात घेता वृक्षारोपणासोबतच वृक्ष संवर्धन आणि जतन करण्याच्या उद्देशाने डॉ. दंदे फाउंडेशनने महत्त्वपूर्ण पुढाकार घेतला
डॉ. दंदे फाउंडेशनच्या वतीनं 'कृष्णवड (माखनकटोरी)' वृक्ष देऊन गडकरींचा सन्मान करताना डॉ. पिनाक दंदे, ज्येष्ठ पत्रकार रवी गुलकरी आणि इतर मान्यवर


नितीन गडकरींच्या उपस्थितीत ‘एक पेड नाती के नाम’ उपक्रमाचा शुभारंभ

नागपूर, 28 मे (हिं.स.) : नागपुरातील वाढते आणि जीवघेणे तापमान लक्षात घेता वृक्षारोपणासोबतच वृक्ष संवर्धन आणि जतन करण्याच्या उद्देशाने डॉ. दंदे फाउंडेशनने महत्त्वपूर्ण पुढाकार घेतला आहे. या उपक्रमाचा शुभारंभ केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आला. फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. पिनाक दंदे यावेळी उपस्थित होते.

या उपक्रमाचे कौतुक करताना नितीन गडकरी यांनी शहरात अधिकाधिक वृक्ष लागवड आणि संवर्धन होण्याची गरज व्यक्त केली. त्यांच्या वाढदिवसानिमित्त फाउंडेशनच्या वतीने ज्येष्ठ नागरिकांच्या सहकार्याने ‘एक पेड नाती के नाम’ हा विशेष उपक्रम राबविण्यात येणार आहे. या अंतर्गत नागपूर शहरातील किमान दहा नगरांतील बगिच्यांमध्ये भारतीय वंशाच्या दुर्मिळ वृक्षांचे रोपण करण्यात येणार असून स्थानिकांच्या सहकार्याने त्यांचे संवर्धनही केले जाणार आहे. पावसाळ्यात दोन-तीन पावसांनंतर या मोहिमेची प्रत्यक्ष अंमलबजावणी सुरू होणार असल्याची माहिती देण्यात आली.

ना. गडकरी यांच्या वाढदिवसानिमित्त पर्यावरणप्रेमी नागरिकांना प्रतीकात्मक स्वरूपात वृक्षांचे वितरण करण्यात आले. यावेळी ‘कृष्णवड’ अर्थात ‘माखनकटोरी’ या दुर्मिळ वृक्षाचे रोप त्यांना भेट देण्यात आले आणि त्याचे रोपणही करण्यात आले.

डॉ. पिनाक दंदे यांनी सांगितले की, फाउंडेशन दुर्मिळ होत चाललेल्या भारतीय वृक्षप्रजातींचे जतन, संवर्धन आणि त्यांचे मल्टिप्लिकेशन करण्यासाठी काम करीत आहे. “केवळ वृक्षारोपण हा उपाय नाही, तर वृक्षांचे संगोपन आणि संवर्धन अधिक महत्त्वाचे आहे,” असे ते म्हणाले. त्यांनी ज्येष्ठ नागरिकांनी ‘एक पेड नाती के नाम’ या उपक्रमात पुढाकार घ्यावा, असे आवाहन केले.

‘कृष्णवड’ किंवा ‘माखनकटोरी’ हा वृक्ष शास्त्रीय भाषेत Ficus krishnae या नावाने ओळखला जातो. मोरेसी कुळातील हा दुर्मिळ आणि पवित्र वृक्ष असून त्याची पाने नैसर्गिकरीत्या कपासारखी दुमडलेली असतात. भगवान कृष्णाने लोणी या पानांत लपवले होते, अशी पौराणिक श्रद्धा असल्यामुळे या वृक्षाला विशेष धार्मिक महत्त्व आहे. आयुर्वेदातही या वृक्षाचा उपयोग विविध आजारांवरील उपचारांसाठी केला जातो.

सध्या ही प्रजाती दुर्मिळ होत चालल्याने पर्यावरण संस्था आणि वनस्पतिशास्त्रज्ञ त्याच्या संवर्धनासाठी विशेष प्रयत्न करत आहेत. डॉ. दंदे फाउंडेशनच्या माध्यमातून भारतीय वंशाच्या दुर्मिळ वृक्षांचे संवर्धन करून पर्यावरण संरक्षणाला चालना देण्याचा प्रयत्न केला जात आहे.

या उपक्रमात सहभागी होण्यासाठी नागरिक आणि सामाजिक संस्थांनी फाउंडेशनच्या रवीनगर चौक येथील कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

----------------------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande