
त्रंबकेश्वर, 28 मे (हिं.स.)। - सिंहस्थ कुंभमेळ्याच्या अनुषंगाने त्र्यंबकेश्वर येथे सुरू झालेली रस्त्याची कामे आणि त्यामुळे निर्माण झालेला गोंधळ, त्यात मंदिराच्या जवळ होत असलेले दर्शनपथाचे काम या सर्वांचा एकत्रिक विचार करता त्र्यंबकेश्वर मंदिर भक्तांसाठी काही दिवस बंद ठेवण्याची शक्यता आहे.
अधिक महिना संपताच २१ जूनपासून मंदिरासमोरचे व्यावसायिक संकुल पाडण्यास प्रारंभ होईल, तसेच आजूबाजूच्या सर्व रस्त्यांचे काम सुरू झालेले असेल. साहजिकच भाविकांना मंदिरात पोहोचणे अवघड होत आहे. मंदिरात दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांच्या वर्दळीने निर्माण होणारा व्यत्यय दिलेल्या मुदतीत काम पूर्ण करण्यावर मर्यादा आणत आहे. यापूर्वी कोव्हिड लॉकडाउनमध्ये सर्व काही बंद होते. ते वगळता वज्रलेप करण्यासाठी ५ ते १२ जानेवारी २०२३ दरम्यान मंदिर बंद ठेवण्यात आले होते. आता 'देऊळबंद'चा दुसरा प्रयोग होण्याची शक्यता आहे.
त्र्यंबकेश्वर मंदिर परिसरातील देवस्थान ट्रस्टचे भाडेकरू असलेली दुकाने हटवण्यात आली आणि भाविकांना खाद्यपेय, चहापाणी मिळणे अवघड झाले आहे. तशात आता वाहनतळ ते मंदिर हा रस्ता खोदला
आहे. या रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी असलेल्या दुकानांपर्यंत पोहोचणे भाविकांना शक्य होत नाही. शिवनेरी धर्मशाळा व्यावसायिक संकुल पाडल्यानंतर तेथे पत्र्याचे बॅरिकेडिंग केले, तेव्हापासून मंदिराचा पूर्व दरवाजावरील दर्शनबारी आणि २०० रुपये दर्शनबारीत जाण्यासाठी भाविकांना रस्ता नाही. शनी मारुती मंदिरापासून आत जाऊन तेथून दर्शनबारीच्या प्रवेशद्वारी पोहोचताना भाविकांची दमछाक होते. त्यातही २०० रुपये तिकीट घेतलेले भाविक शनिवार, रविवार व शासकीय सुटीच्या दिवशी जमेल तेथे उभे राहतात आणि या परिसरात गोंधळाची परिस्थिती निर्माण होत असते.
दरम्यान, रस्ते खोदकामांनी पिण्याचे पाणी, वीजपुरवठा या सेवा विस्कळीत झाल्या आहेत. भाविक पर्यटकांना असुविधांचा सामना करावा लागत असल्याने याचा फटका व्यावसायिकांनाही बसत आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV