
अमरावती, 28 मे (हिं.स.)।
विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाची रणधुमाळी सुरू झाली असून राजकीय पक्षांचे उमेदवार जाहीर झालेले नाहीत. अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत एक जून आहे. आतापर्यंत पंचवीस इच्छुकांनी ४५ अर्जांची उचल केली असली तरी एकाही उमेदवाराचा अर्ज दाखल झालेला नाही. पक्षीय उमेदवारांकडे राजकीय वर्तूळाचे लक्ष लागले असून त्यांची नावे जाहीर झाल्यानंतरच खरी रंगत येणार आहे. दरम्यान, बुधवारी (ता.२७) चार इच्छुकांनी अर्ज घेतलेत. महाराष्ट्र विधान परिषदेच्या अमरावती स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक १८ जून रोजी होऊ घातली आहे. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सोमवार २५ मेपासून नामांकन दाखल प्रक्रियेला सुरवात झाली. जिल्हाधिकारी कार्यालयात सकाळी ११ ते दुपारी तीन वाजेदरम्यान नामांकन अर्ज उचल व स्वीकारण्याची प्रक्रिया सुरू आहे. बुधवारी (ता.२७) चार इच्छुकांनी पाच नामांकन अर्ज उचललेत. यामध्ये सचिन डोके, अण्णाजी कुंबालकर, अ. नाजीम अ. रऊफ, सुरेश मेश्राम यांचा समावेश आहे. भाजपकडून माजी राज्यमंत्री प्रवीण पोटे यांनी स्वतःसाठी व पत्नीसाठी अर्ज घेतले आहेत. तर भाजपचे जिल्हाध्यक्ष डॉ. नितीन धांडे यांच्यासह काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बबलू देशमुख, माजी आमदार वीरेंद्र जगताप यांनी अर्जांची उचल केली आहे. इतर दिग्गजांमध्ये नागपूरचे व्यावसायिक हर्षजित देशमुख यांचा प्रामुख्याने समावेश आहे. अर्ज दाखल करण्यासाठी तीन दिवस शिल्लक आहेत.
---------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी