
लातूर, 28 मे (हिं.स.)। विलास सहकारी साखर कारखाना लि., वैशालीनगर (निवळी), ता. जि. लातूर येथे दरवर्षीप्रमाणे यंदाही लातूर जिल्हा सहकारी बोर्ड आणि लातूर जिल्हा उपनिबंधक (सहकार खाते) यांच्या सहकार्याने कारखान्याचे संचालक मंडळ, अधिकारी व कर्मचारी यांच्यासाठी 'सहकार शिक्षण व प्रशिक्षण' कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
दिनांक २७ मे २०२६ ते २८ मे २०२६ या कालावधीत कारखान्याच्या सभागृहात हे दोन दिवसीय प्रशिक्षण शिबिर उत्साहात पार पडले. या शिबिराच्या अध्यक्षस्थानी कारखान्याचे व्हाईस चेअरमन वैजनाथराव शिंदे होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक कार्यकारी संचालक श्री. आबासाहेब पाटील यांनी केले.या प्रशिक्षण शिबिरात महाराष्ट्र राज्य सहकारी संघ, पुणेचे माजी मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. ए. एस. शिंदे, लातूर जिल्हा सहकारी बँकेचे जिल्हा सहकारी विकास अधिकारी श्री. एस. एस. देशमुख आणि तज्ञ व्याख्याते श्री. सदाम शेख यांनी उपस्थितांना सहकार कायद्यातील तरतुदींबाबत सखोल मार्गदर्शन केले.प्रशिक्षणादरम्यान संचालक, अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना कामकाजातील समन्वय, वेळेचे प्रभावी नियोजन, उपविधीतील (By-laws) तरतुदी, क्रियाशील सभासद होण्यासाठी आवश्यक पात्रता, सहकारातील कायदे-कानून आणि कर्मचाऱ्यांवरील ताणतणाव व्यवस्थापन या विषयांवर तज्ज्ञांनी मार्गदर्शन केले. या दोन दिवसीय प्रशिक्षण शिबिरात कारखान्याचे संचालक मंडळ, अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला.
------------------
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis