
नाशिक, 28 मे (हिं.स.) : स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या जयंतीनिमित्त भगुर येथील सावरकर वाडा आणि स्मारक परिसरात विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी स्वा. सावरकर आणि धर्मवीर डॉ. बा. शि. मुंजे यांच्या संयुक्त कार्याची माहिती देणाऱ्या चार भव्य प्रतिमा सेंट्रल हिंदू मिलिटरी एज्युकेशन सोसायटीतर्फे भेट देण्यात आल्या.
जाज्वल्य हिंदुत्व आणि राष्ट्रभक्तीची प्रेरणा युवकांमध्ये रुजविण्यासाठी सावरकर आणि धर्मवीर मुंजे यांनी केलेल्या कार्याचे दर्शन या प्रतिमांमधून घडत असल्याने उपस्थितांनी समाधान व्यक्त केले. जुन्या ऐतिहासिक आठवणींना उजाळा देणाऱ्या या प्रतिमांनी सर्वांचेच लक्ष वेधून घेतले.
यावेळी सेंट्रल हिंदू मिलिटरी एज्युकेशन सोसायटीचे कार्याध्यक्ष अॅड. अविनाश भिडे यांनी सावरकरांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. कार्यक्रमाला सरकार्यवाह सीएमए हेमंत देशपांडे, नाशिक विभागाचे उपाध्यक्ष डॉ. मनोहर शिंदे, कार्यकारिणी सदस्य आनंद देशपांडे, नरेंद्र वाणी, अॅड. सुयोग शहा, स्कूलचे कमांडंट संदीप पुरी, विश्व हिंदू परिषदेचे ज्येष्ठ नेते एकनाथराव शेटे, नगराध्यक्षा प्रेरणा बलकवडे, मृत्युंजय कापसे आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमादरम्यान संस्थेतर्फे आयोजित करण्यात आलेल्या पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट कॅम्प (PDC) मधील शिबिरार्थींनाही सावरकर वाड्यास भेट देण्यात आली. या वेळी त्यांना स्वा. सावरकर यांच्या राष्ट्रप्रेम, त्याग आणि प्रेरणादायी कार्याची माहिती देण्यात आली.
कार्यक्रमाच्या शेवटी शिबिरार्थींनी सावरकर गीतांचे सादरीकरण करत देशभक्तीचा जल्लोष केला.
---------------
हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV