माखला गावातील मूलभूत सुविधांसाठी राष्ट्रपतींकडे ग्रामस्थांची आर्त मागणी
अमरावती, 28 मे (हिं.स.) : चिखलदरा तालुक्यातील माखला हे गाव अतिशय दुर्गम व अतिसंरक्षित जंगल परिसरात वसलेले असून, स्वातंत्र्यानंतरही या गावाला आजपर्यंत मूलभूत सुविधांपासून वंचित राहावे लागत असल्याची गंभीर बाब समोर आली आहे. त्यामुळे संतप्त ग्रामस्थांन
माखला गावातील मूलभूत सुविधांसाठी राष्ट्रपतींकडे ग्रामस्थांची आर्त मागणी


अमरावती, 28 मे (हिं.स.) : चिखलदरा तालुक्यातील माखला हे गाव अतिशय दुर्गम व अतिसंरक्षित जंगल परिसरात वसलेले असून, स्वातंत्र्यानंतरही या गावाला आजपर्यंत मूलभूत सुविधांपासून वंचित राहावे लागत असल्याची गंभीर बाब समोर आली आहे. त्यामुळे संतप्त ग्रामस्थांनी थेट देशाच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना पत्र लिहून न्याय मिळवून देण्याची विनंती केली आहे.

मेळघाटातील आदिवासीबहुल माखला गावात अद्यापही वीज, पिण्याचे पाणी तसेच जाण्या-येण्यासाठी रस्त्याची सुविधा उपलब्ध नाही. शासनाकडून २०१९ मध्ये नवीन विहीर व पाण्याची टाकी मंजूर करण्यात आली होती, मात्र आजतागायत त्या कामांना सुरुवात झालेली नाही, असा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.

गावात इयत्ता पहिली ते आठवीपर्यंत शाळा असली तरी विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी पुरेसे शिक्षक नाहीत. तसेच नवीन शाळा इमारतीची मागणीही ग्रामस्थांनी केली आहे. याशिवाय अतिक्रमित शेतीला पट्टे वाटप करणे, आरोग्य अधिकारी व आशा वर्करची नियुक्ती करणे, वनजमिनीवर नवीन तलाव उभारणे तसेच सामूहिक व खासगी विहिरींच्या खोलीकरणासाठी सुरुंगाद्वारे खोदकाम करण्यास परवानगी देण्याची मागणी करण्यात आली आहे.

गावात मोबाईल कनेक्टिव्हिटीसाठी टॉवर उभारावा, जंगलातील कुलदेवतेच्या ठिकाणी पूजाअर्चेस परवानगी द्यावी तसेच १७ संवर्ग भरती प्रक्रिया तातडीने पूर्ण करावी, अशीही मागणी ग्रामस्थांनी पत्रातून केली आहे.

वीज, पाणी, रस्ते, शेतीचे दावे आणि गावठाण यांसारख्या मूलभूत सुविधा वन्यजीव संरक्षण कायद्यामुळे मिळत नसल्याचा आरोप करत, या कायद्यात आवश्यक बदल करण्याची मागणीही ग्रामस्थांनी राष्ट्रपतींकडे केली आहे.

-----------------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande