बेकायदेशीर ट्रान्सफॉर्मर स्थलांतरावेळी विजेचा धक्का; कामगाराचा जागीच मृत्यू
बीड, 28 मे (हिं.स.) : केज तालुक्यातील लाडेवडगाव येथे शेतातील ट्रान्सफॉर्मर (एचव्हीडीएस डीपी) दुसऱ्या ठिकाणी हलवण्याचे काम सुरू असताना विजेचा तीव्र धक्का लागून एका कामगाराचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. संतोष सर्जेराव निकम (वय 38, रा. प
बेकायदेशीर ट्रान्सफॉर्मर स्थलांतरावेळी विजेचा धक्का; कामगाराचा जागीच मृत्यू


बीड, 28 मे (हिं.स.) : केज तालुक्यातील लाडेवडगाव येथे शेतातील ट्रान्सफॉर्मर (एचव्हीडीएस डीपी) दुसऱ्या ठिकाणी हलवण्याचे काम सुरू असताना विजेचा तीव्र धक्का लागून एका कामगाराचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. संतोष सर्जेराव निकम (वय 38, रा. पोखरी, ता. अंबाजोगाई) असे मृत कामगाराचे नाव आहे.

या प्रकरणी कामाच्या ठिकाणी कोणतीही सुरक्षाव्यवस्था न ठेवता निष्काळजीपणा केल्याचा ठपका ठेवत खाजगी कंत्राटदार आणि महावितरणच्या एका लाईनमनविरुद्ध युसुफ वडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, लाडेवडगाव येथील शेतकरी सुभाष ढाकणे यांच्या शेतात ‘एक शेतकरी, एक ट्रान्सफॉर्मर’ योजनेअंतर्गत महावितरणची डीपी उभारण्यात आली होती. ही डीपी अधिकृत परवानगी न घेता आणि शिफ्टिंग शुल्क टाळण्यासाठी दुसऱ्या ठिकाणी हलवण्याचे काम सुरू होते. हे काम खाजगी कंत्राटदारामार्फत करण्यात येत होते.

या कामासाठी संतोष निकम यांच्यासह अन्य तीन मजुरांना रोजंदारीवर कामावर बोलावण्यात आले होते. काम सुरू करण्यापूर्वी वीज पुरवठा पूर्णपणे खंडित असल्याची खात्री करण्याची जबाबदारी संबंधित लाईनमनवर होती. मात्र, त्याने वीज बंद असल्याचे सांगून घटनास्थळ सोडल्याचे सांगण्यात येत आहे.

दरम्यान, कंत्राटदार आणि संबंधितांनी संतोष निकम यांना खांबावर चढून ट्रान्सफॉर्मरवरील मुख्य वायर सोडवण्यास सांगितले. ते काम करत असतानाच अचानक वीज पुरवठा सुरू झाला आणि संतोष यांना जोरदार विजेचा धक्का बसला. त्यामुळे ते थेट खाली कोसळले आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला.

या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून, संबंधित दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे. पोलिसांनी पुढील तपास सुरू केला आहे.

---------------------

हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis


 rajesh pande