
नांदेड, 28 मे (हिं.स.) : महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य सेवा संचालनालयाच्या निर्देशानुसार शाश्वत विकास ध्येयांतर्गत गाव पातळीवर शून्य कुष्ठरोग प्रलंबन साध्य करण्यासाठी नांदेड जिल्ह्यात “शून्य कुष्ठरोग मोहीम” यशस्वीपणे सुरू करण्यात आली आहे.
ही मोहीम जिल्हाधिकारी राहुल कर्डिले आणि जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मेघना कावली यांच्या मार्गदर्शनाखाली राबवली जात आहे. जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संजय पेरके, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संतोष सूर्यवंशी आणि सहसंचालक आरोग्य सेवा (कुष्ठरोग) डॉ. बालन यांच्या नेतृत्वाखाली आरोग्य यंत्रणा पूर्ण क्षमतेने कार्यरत आहे.
या मोहिमेंतर्गत जिल्ह्यात एकूण 1,604 गावांचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. मागील पाच वर्षांत कुष्ठरोगाचा शून्य प्रादुर्भाव नोंदवलेल्या 892 गावांची विशेष सर्वेक्षणासाठी निवड करण्यात आली आहे.
या गावांतील एकूण लक्ष्यित लोकसंख्या 4,81,055 इतकी असून आतापर्यंत आरोग्य कर्मचाऱ्यांनी 85,133 नागरिकांचे यशस्वी सर्वेक्षण पूर्ण केले आहे.
गेल्या आठवड्यातील तपासणीत जिल्ह्यात 285 संशयित रुग्ण आढळून आले आहेत. त्यांची पुढील वैद्यकीय तपासणी आणि आवश्यक उपचार तातडीने सुरू करण्यात आले असल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली आहे.
जिल्हा प्रशासनाने ही मोहीम व्यापक स्वरूपात राबवून कुष्ठरोगाचे पूर्ण उच्चाटन साध्य करण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.
-------------------
हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis