
पुणे, 28 मे, (हिं.स.) राज्यातील इयत्ता अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेच्या पहिल्या नियमित फेरीसाठी मंगळवारपर्यंत १२ लाख ५१ हजार २९४ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. या प्रवेश प्रक्रियेतील पहिली निवड यादी आणि कट-ऑफ येत्या शुक्रवारी (ता. २९) जाहीर करण्यात येणार आहेत.राज्यातील सर्व कनिष्ठ महाविद्यालयांसाठी माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण विभागाकडून केंद्रीय ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येत आहे. प्रवेशाच्या पहिल्या फेरीदरम्यान संकेतस्थळावर तांत्रिक अडचणी निर्माण झाल्याने अर्जाचा दुसरा भाग भरण्यासाठी सुरुवातीला सोमवारपर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती.दरम्यान, या संदर्भात मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर सुनावणी झाली. न्यायालयाच्या आदेशानुसार प्रवेश प्रक्रियेस मंगळवारी सकाळी सहा वाजेपर्यंत अतिरिक्त मुदत देण्यात आली.या वाढीव मुदतीत राज्यभरातील १२ लाख ५१ हजार २९४ विद्यार्थ्यांनी नोंदणी पूर्ण केली. त्यामध्ये सहा लाख १८ हजार ३६९ विद्यार्थी आणि सहा लाख १६ हजार ३४५ विद्यार्थिनींचा समावेश आहे. तसेच एक लाख ५८ हजार ८४९ विद्यार्थ्यांनी प्रवेश शुल्क भरले असून, एक लाख ११ हजार ८०९ विद्यार्थ्यांनी अर्जाचा पहिला भाग लॉक केला आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु