
पुणे, 28 मे (हिं.स.) जनगणनेचे काम १४ जूनपूर्वी पूर्ण करण्याचे मोठे आव्हान प्रशासनासमोर असताना काही कर्मचारी या महत्त्वाच्या कामाकडे दुर्लक्ष करत असल्याचे समोर आले आहे. या पार्श्वभूमीवर पुणे महापालिका आयुक्तनवल किशोर राम यांनी निष्काळजी कर्मचाऱ्यांवर थेट फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. आयुक्तांनी पाच परिमंडळांचे उपायुक्त आणि १५ क्षेत्रीय कार्यालयांच्या सहाय्यक आयुक्तांची बैठक घेऊन जनगणना कामकाजाचा आढावा घेतला. शहरातील काही भागांमध्ये कामाचा वेग अत्यंत मंद असल्याबद्दल त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.महापालिका क्षेत्रातील सुमारे ६० टक्के प्रगणक गटांमध्ये घरोघरी जाऊन माहिती संकलनाचे काम सुरू झाले असले, तरी उर्वरित ४० टक्के ठिकाणी अद्याप काम सुरू झालेले नाही. विशेषतः नगर रस्ता, येरवडा-वाघोली, ढोले पाटील रस्ता, औंध-बाणेर आणि सिंहगड रस्ता या पाच क्षेत्रीय कार्यालयांच्या हद्दीत ५० टक्क्यांहून कमी काम पूर्ण झाल्याची माहिती बैठकीत समोर आली.राष्ट्रीय कर्तव्यात कसूर करणाऱ्या कर्मचाऱ्यांची कोणतीही गय केली जाणार नसल्याचा इशारा देत आयुक्तांनी संबंधित अधिकाऱ्यांना कामात गती आणण्याचे निर्देश दिले.
---------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु