
पुणे, 28 मे (हिं.स.)।
पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिकांकडून प्रक्रिया न करता थेट नदीपात्रात सोडण्यात येणाऱ्या सांडपाण्यामुळे मुळा-मुठा आणिभीमा नदी काठावरील तब्बल ७० ते ८० गावे गंभीर जलप्रदूषणाच्या विळख्यात सापडली आहेत. दूषित पाण्यामुळे परिसरातील विहिरी आणि अन्य पाणी स्रोत खराब झाले असून ग्रामीण भागातील नागरिकांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होत आहेत.या प्रदूषित पाण्यामुळे कॅन्सर, किडनी स्टोन, त्वचारोग यांसारख्या आजारांचे प्रमाण वाढत असल्याची चिंता व्यक्त केली जात आहे. तसेच जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचाही प्रश्न गंभीर बनला आहे.
नदीकाठावरील जुने जलशुद्धीकरण प्रकल्प बंद असल्याने ग्रामस्थांना नाईलाजाने दूषित पाण्याचाच वापर करावा लागत आहे.या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषद अध्यक्ष वीरधवल जगदाळे यांनी पालकमंत्री सुनेत्रा पवार यांची भेट घेऊन संबंधित महापालिकांनी निधी उपलब्ध करून या गावांमध्ये तातडीने पाणी शुद्धीकरण प्रकल्प उभारावेत, अशी मागणी केली आहे.दरम्यान, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने यापूर्वीच पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिकांना नोटिसा बजावल्या आहेत. घरगुती तसेच औद्योगिक सांडपाणी थेट नदीत मिसळत असल्याने नदीचे प्रदूषण वाढत असल्याचे निदर्शनास आले आहे.नदीपात्र स्वच्छ करणे, प्रदूषण होणाऱ्या ठिकाणांची ओळख पटवून त्यावर उपाययोजना करणे, तसेच नदीकाठ विकसित करण्यासाठी पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिका तसेचपुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण यांच्या माध्यमातून विविध जलशुद्धीकरण प्रकल्प हाती घेण्यात आले आहेत. मात्र, या प्रकल्पांमध्ये अपेक्षित गती दिसून येत नसल्याने त्याचा फटका नदीकाठच्या गावांना बसत आहे.या समस्येची गंभीर दखल घेत पालकमंत्री सुनेत्रा पवार यांनी सांडपाणी प्रदूषण रोखण्यासाठी आणि आवश्यक उपाययोजनांबाबत लवकरच सकारात्मक निर्णय घेतला जाईल, असे आश्वासन दिले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु