
सिंगापूर, 28 मे (हिं.स.) । दोन वेळ ऑलिम्पिक पदक विजेत्या पीव्ही सिंधूने सिंगापूर ओपन सुपर ७५० बॅडमिंटन स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. महिला एकेरीच्या सामन्यात सिंधूने जपानच्या रिको गुंजीचा २१-९, २१-१२ असा पराभव करून पुढील फेरीत प्रवेश केला. सिंधूचा पुढील प्रवास सोपा नसेल, कारण उपांत्यपूर्व फेरीत तिचा सामना कोरियाच्या अव्वल मानांकित ॲन से यंगशी होणार आहे.
पॅरिस २०२४ चा रौप्यपदक विजेता, थायलंडचा कुन्लावुत विटिडसर्न याने सामना सुरू होऊन अवघ्या एका मिनिटात आणि केवळ दोन गुणांनंतरच माघार घेतल्यामुळे, लक्ष्य सेनला उपांत्यपूर्व फेरीत 'वॉकओव्हर' मिळाला. शुक्रवारी होणाऱ्या उपांत्यपूर्व फेरीत लक्ष्य सेनचा सामना जपानच्या, जागतिक क्रमवारीत १९ व्या क्रमांकावर असलेल्या कोकी वातानाबे याच्याशी होईल.
भारताच्या चौथ्या मानांकित पुरुष दुहेरी जोडी सात्विकसाईराज रंकीरेड्डी आणि चिराग शेट्टी यांना मात्र उपांत्यपूर्व फेरीत पोहोचण्यासाठी चांगलचे कष्ट करावे लागले. त्यांनी चायनीज तैपेईच्या ली झी हुई आणि यांग पो सुआन यांचा २१-१५, ११-२१, २१-१८ असा पराभव केला. सात्विक आणि चिराग यांचा सामना आता मलेशियाच्या खाई जिंग कांग आणि ॲरॉन ताई यांच्याशी होणार आहे.
ध्रुव कपिला आणि तनिषा क्रास्टो या भारतीय मिश्र दुहेरीच्या जोडीनेही उपांत्यपूर्व फेरी गाठली आहे. त्यांनी जपानच्या युटा वातानाबे आणि माया तागुची यांचा ८-२१, २१-१७, २१-१६ असा पराभव केला. या भारतीय जोडीचा सामना आता किम जे ह्योन जांग आणि हा जोंग किंवा तिसरे मानांकित मलेशियन जोडी चेन टँग जी आणि तोह ई वेई यांच्यापैकी एकाशी होईल.
---------------
हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे