
म्युनिक, 28 मे (हिं.स.) ईशा सिंगने महिलांच्या २५ मीटर पिस्तूल प्रकारात शानदार कामगिरी करत विश्वविक्रमासह सुवर्णपदक पटकावले. तीन वेळा विश्व चॅम्पियनशिप पदक विजेत्या ईशाने आयएसएसएफ विश्वचषकाच्या दुसऱ्या दिवशी भारताच्या पदकाचे खाते उघडले. या भारतीय नेमबाजने अंतिम फेरीत ४३ गुणांचा विश्वविक्रम नोंदवला आणि यजमान जर्मनीच्या माजी विश्वविजेत्या डोरीन वेनेकॅम्पवर पाच गुणांनी मात केली. बल्गेरियाच्या मिरोस्लावा मिंचेवाने कांस्यपदक जिंकले.
ऑलिंपिक शूटिंग रेंजवर झालेल्या अंतिम फेरीत ईशाने सुरुवातीपासूनच वर्चस्व गाजवले. तिने पहिल्या तीन सिरीजमध्ये अचूक गुण मिळवून इतर स्पर्धकांवर मोठी आघाडी घेतली. ईशाने दोन वर्षांपूर्वी बाकू येथे कोरियाच्या किम ये-जीने नोंदवलेला ४२ गुणांचा विश्वविक्रम मोडला. तिने यांग जिनचा ४१ गुणांचा ज्युनियर विश्वविक्रमही मागे टाकला. विद्यमान ऑलिम्पिक चॅम्पियन यांग जिन या स्पर्धेत पाचव्या स्थानावर राहिली.
ईशाने पात्रता फेरीच्या प्रिसिजन राऊंडमध्ये २९३ आणि रॅपिड फायर राऊंडमध्ये २९४ गुण मिळवले. एकूण ५८७ गुणांसह, तिने चौथ्या स्थानावर अंतिम फेरीसाठी पात्रता मिळवली. इतर भारतीय नेमबाज मनू भाकर आणि राही सरनोबत यांनी अनुक्रमे ५८२ आणि ५८१ गुणांसह १२वे आणि १४वे स्थान पटकावले.
सुवर्णपदक जिंकल्यानंतर ईशा सिंग म्हणाली, म्युनिक माझ्यासाठी खूप महत्त्वाचे आहे. येथील पिस्तूल प्रकारातील स्पर्धा खूप कठीण आहे. पहिल्या ८ मध्ये स्थान मिळवणे देखील सोपे नाही. येथे स्पर्धा करण्याची ही माझी तिसरी वेळ होती आणि मला यावेळी जिंकायचे होते. अंतिम फेरीच्या दबावाबद्दल ती म्हणाली, मी अजिबात शांत नव्हते. एका क्षणी माझा डावा हात थरथरत होता. मी खूप घाबरले होते, पण आमच्या खेळात तुम्हाला त्या दबावाला सामोरे जावेच लागते आणि यालाच अनुभव म्हणतात.
---------------
हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे