अमरावती जिल्ह्यात ‘लाडकी बहीण’ योजनेत मोठी छाननी; 1.21 लाख महिलांना लाभातून वगळले
अमरावती, 29 मे (हिं.स.) : मुख्यमंत्री ‘लाडकी बहीण’ योजनेअंतर्गत अटी-शर्तींच्या आधारावर लाभार्थी महिलांची दुसऱ्यांदा छाननी करण्यात आली असून, जिल्ह्यात तब्बल 1 लाख 21 हजार 818 महिलांचा योजनेतील लाभ बंद करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. अपात्र ठरवि
१.२१ लाख लाडक्या बहिणी हद्दपार ?


अमरावती, 29 मे (हिं.स.) : मुख्यमंत्री ‘लाडकी बहीण’ योजनेअंतर्गत अटी-शर्तींच्या आधारावर लाभार्थी महिलांची दुसऱ्यांदा छाननी करण्यात आली असून, जिल्ह्यात तब्बल 1 लाख 21 हजार 818 महिलांचा योजनेतील लाभ बंद करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. अपात्र ठरविण्यात आलेल्या महिलांना विविध निकषांनुसार यादीतून वगळण्यात आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, एका कुटुंबातील एकच महिला, वयोमर्यादा, कुटुंबात चारचाकी वाहन असणे, तसेच केवायसी प्रक्रियेत त्रुटी अशा कारणांवरून अनेक लाभार्थींना अपात्र ठरविण्यात आले आहे. पडताळणी प्रक्रियेमुळे लाभार्थ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात कमी झाली आहे.

जिल्ह्यात या योजनेसाठी एकूण 7 लाख 20 हजार 575 महिलांनी अर्ज केले होते. त्यापैकी 22 हजार 472 अर्ज सुरुवातीला अपात्र ठरविण्यात आले होते, तर 6 लाख 98 हजार 103 महिलांना लाभ मंजूर करण्यात आला होता.

त्यानंतर झालेल्या दुसऱ्या टप्प्यातील पडताळणीत आणखी 55 हजारांहून अधिक महिलांना योजनेतून वगळण्यात आले आहे. यामध्ये सर्वाधिक अपात्रता एका कुटुंबातील एकापेक्षा अधिक महिलांनी लाभ घेतल्याच्या कारणावरून झाली आहे.

सूत्रांच्या माहितीनुसार, कुटुंबातील विवाहित आणि अविवाहित महिला अशा दोघींनी लाभ घेतल्याचे अनेक प्रकरणांमध्ये आढळले. या निकषात न बसणाऱ्या तब्बल 49 हजार 493 महिलांना वगळण्यात आले आहे.

दरम्यान, चारचाकी वाहनधारक महिलांची स्वतंत्र पडताळणी करण्यात आली असून, 5 हजार 992 महिलांची नावे आरटीओकडे तपासणीसाठी पाठवण्यात आली होती. त्यापैकी 4 हजार 707 महिलांच्या नावावर चारचाकी वाहन आढळल्याने त्यांनाही योजनेतून वगळण्यात आले आहे.

या निर्णयामुळे अनेक लाभार्थी महिलांवर परिणाम झाला असून, योजनेच्या निकषांवर आधारित छाननी पुढेही सुरू राहणार असल्याचे संकेत मिळत आहेत.

------------------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande