
लातूर, 29 मे (हिं.स.)।
: वाढत्या रस्ते अपघातांना आळा घालण्यासाठी आणि गरजू रुग्णांचे प्राण वाचवण्यासाठी शिरूर अनंतपाळ पोलीस ठाण्याच्या वतीने एक आगळावेगळा व अत्यंत स्तुत्य असा सामाजिक उपक्रम राबवण्यात आला. शिरूर अनंतपाळ पोलीस स्टेशन येथे भव्य रक्तदान शिबिर आणि मोफत हेल्मेट वाटप कार्यक्रम अत्यंत उत्साहात संपन्न झाला. या शिबिराचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे यामध्ये सहभागी होऊन रक्तदान करणाऱ्या रक्तदात्यास रोटरी क्लब लातूरच्या वतीने मोफत हेल्मेटचे वाटप करण्यात आले. 'एक हेल्मेट, एक जीवन' हा सुरक्षेचा महत्त्वपूर्ण संदेश या नाविन्यपूर्ण उपक्रमाच्या माध्यमातून समाजापर्यंत यशस्वीपणे पोहोचवण्यात आला.
हा भव्य उपक्रम लातूरचे पोलीस अधीक्षक अमोल तांबे आणि शिरूर अनंतपाळ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अनंत भंडे यांच्या मार्गदर्शनाखाली अत्यंत नेटकेपणाने पार पडला. महाराष्ट्र पोलीस व लातूर पोलीस यांच्या वतीने आयोजित या शिबिरासाठी इंडियन रेडक्रॉस सोसायटी (जिल्हा शाखा लातूर) संचलित डॉ. भालचंद्र ब्लड सेंटर, लातूर आणि रोटरी क्लब लातूर (मिडटाऊन जिल्हा ३१३२) यांनी संयुक्त विद्यमाने पुढाकार घेऊन मोलाचे सहकार्य केले. दुचाकी चालवताना हेल्मेटचा वापर करणे म्हणजेच सुरक्षित प्रवास करणे होय, हा संदेश देत रक्ताचा तुटवडा भरून काढणे हाच या शिबिराचा मुख्य उद्देश असल्याचे अहमदपूरचे पोलीस निरीक्षक अनंत भंडे यांनी याप्रसंगी स्पष्ट केले.
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis