
कोल्हापूर, 29 मे (हिं.स.) : कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या वतीने आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित ‘एईपीएस’ (Aadhaar Enabled Payment System) अर्थात आधार इनॅबल पेमेंट सिस्टीमचा शुभारंभ शनिवारी दि. ३० मे रोजी करण्यात येणार आहे. बँकेचे अध्यक्ष तथा राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते हा कार्यक्रम पार पडणार असून, उपाध्यक्ष तथा माजी आमदार राजूबाबा आवळे यांच्या अध्यक्षतेखाली बँकेच्या केंद्र कार्यालयात सायंकाळी ५ वाजता उद्घाटन सोहळा आयोजित करण्यात आला आहे.
ही सेवा बायोमेट्रिक तंत्रज्ञानावर आधारित असून, ग्राहकांना आधार क्रमांक आणि बोटांच्या ठशाच्या साहाय्याने विविध बँकिंग व्यवहार करता येणार आहेत. यामध्ये पैसे काढणे, खात्यातील शिल्लक तपासणे तसेच निधी हस्तांतरण यांसारख्या सुविधा उपलब्ध होणार आहेत.
AEPS सेवेमुळे ग्राहकांना एटीएम कार्ड किंवा पिनची आवश्यकता भासणार नाही. बँकेच्या शाखांबरोबरच गाव पातळीवरील विकास संस्था आणि दूध संस्थांमध्ये मायक्रो एटीएमद्वारे ही सेवा उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांना जवळच्या ग्राहक सेवा केंद्रातून सहज बँकिंग व्यवहार करता येणार आहेत.
ही सेवा सुरू करण्यासाठी ग्राहकांनी एकदाच बँकेच्या शाखेला भेट देऊन AEPS प्रणालीस संमती देणे आवश्यक राहणार आहे. विशेषतः ज्येष्ठ नागरिक, शेतकरी आणि ग्रामीण भागातील नागरिकांसाठी ही सुविधा अत्यंत उपयुक्त ठरणार असल्याचे बँकेकडून सांगण्यात आले आहे. या प्रणालीमुळे आर्थिक समावेशनालाही चालना मिळणार आहे.
दरम्यान, बँकेच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या ‘पी. एम. सूर्यघर’ योजनेविषयी माहिती देण्यासाठी तसेच ग्राहकांच्या शंकांचे निरसन करण्यासाठी या कार्यक्रमास महावितरणचे अधिकारीही उपस्थित राहणार असल्याची माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी जी. एम. शिंदे यांनी दिली.
-----------------------------
हिंदुस्थान समाचार / VijayKumar Pandurang Powar