
अमरावती, 29 मे (हिं.स.) : अचलपूर शहरात अज्ञात समाजकंटकांकडून नागरिकांच्या मालमत्तेला लक्ष्य करण्याच्या घटना पुन्हा समोर आल्या आहेत. बुंदेलपुरा परिसरात एका भाजी विक्रेत्याची घरासमोर उभी असलेली दुचाकी मध्यरात्री पेटवून देण्यात आल्याची घटना घडली. गेल्या सहा महिन्यांत अशा प्रकारची ही दुसरी घटना असल्याने शहरातील कायदा व सुव्यवस्थेबाबत चिंता व्यक्त केली जात आहे.
प्राप्त माहितीनुसार, बुंदेलपुरा येथील रहिवासी प्रेमचंद रूपचंद चंदेले (वय 38) हे भाजीपाला विक्रीचा व्यवसाय करतात. त्यांनी नेहमीप्रमाणे आपली दुचाकी घरासमोर उभी केली होती. मध्यरात्रीनंतर सुमारे दीड वाजताच्या सुमारास अज्ञात व्यक्तीने वाहनावर ज्वलनशील पदार्थ टाकून आग लावल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. काही क्षणांतच दुचाकीने पेट घेतला आणि वाहन पूर्णपणे जळून खाक झाले.
आगीची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत आग विझविण्याचा प्रयत्न केला. मात्र, तोपर्यंत वाहनाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. घटनेची माहिती मिळाल्यानंतर अचलपूर पोलिसांनी घटनास्थळी भेट देत पंचनामा केला आणि अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला.
दरम्यान, शहरात वारंवार घडणाऱ्या जाळपोळ घटनांमुळे पोलिसांच्या रात्रीच्या गस्त व्यवस्थेवर नागरिकांनी प्रश्न उपस्थित केले आहेत. यापूर्वी 31 डिसेंबर रोजी सुलतानपुरा भागात बांधकाम व्यावसायिक भगवानदास कोठार यांच्या घरासमोर उभ्या असलेल्या दोन दुचाकी आणि एका सायकलला आग लावण्यात आली होती. त्या प्रकरणातही आरोपी अद्याप मोकाट असल्याची चर्चा शहरात आहे.
नागरिकांनी पोलिस प्रशासनाने तातडीने कठोर पावले उचलून रात्रीची गस्त वाढवावी, संवेदनशील भागांत सीसीटीव्ही यंत्रणा कार्यान्वित करावी आणि अशा समाजकंटकांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी केली आहे. शहरात वाढत्या अशा घटनांमुळे नागरिकांमध्ये भीती आणि असुरक्षिततेचे वातावरण निर्माण झाले आहे.
--------------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी