
बीड, 29 मे (हिं.स.)।
अंबाजोगाई तालुक्यातील बर्दापूर येथे लागलेल्या भीषण आगीत भावाच्या लहान मुलांना वाचवताना गंभीररीत्या भाजलेल्या ५५ वर्षीय रब्बानी शेख या महिलेचा येथील शासकीय रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. स्वतःच्या जीवाची पर्वा न करता निष्पाप बालकांचे प्राण वाचवणाऱ्या या बहिणीच्या मृत्यूने परिसरात तीव्र हळहळ व्यक्त होत आहे.
बर्दापूर येथील रहिवासी शेख शेरू शेख हुजूर यांच्या घराला अचानक भीषण आग लागली. घरात लहान मुले अडकल्याचे समजताच शेरू यांची बहीण रब्बानी शेख आणि भाचा अजीम शेख यांनी तात्काळ घरात धाव घेतली. त्यांनी मुलांना सुखरूप बाहेर काढले, मात्र या प्रक्रियेत रब्बानी शेख या ६० टक्के भाजल्या गेल्या. त्यांच्यासह कुटुंबातील इतर सदस्यही आगीच्या भक्ष्यस्थानी पडले. सर्व जखमींना तात्काळ अंबाजोगाई येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. दुर्दैवाने, रब्बानी शेख यांची प्राणज्योत उपचारादरम्यान विझली. या दुर्घटनेत गंभीर जखमी झालेले शेख शेरू, तनवीर शेख, तोफिक शेख आणि अजीम शेख यांच्यावर रुग्णालयात अद्याप शर्थीचे उपचार सुरू असून त्यांची प्रकृती चिंताजनक आहे. पोलीस आणि प्रशासन या घटनेचा पुढील तपास करत आहेत.
---------------
हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis