
पुणे, 29 मे (हिं.स.,)
भाटघर धरणातील पाणीसाठा केवळ ८ टक्क्यांवर आल्याने भोर शहरावर पुन्हा एकदा पाणीटंचाईचे संकट गडद झाले आहे. गेल्या आठ दिवसांपासून शहरात दिवसाआड आणि कमी दाबाने पाणीपुरवठा केला जात असून नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. दरवर्षी मे महिन्याच्या अखेरीस आणि जूनच्या सुरुवातीला उद्भवणाऱ्या या समस्येवर अद्याप कायमस्वरूपी उपाययोजना न झाल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे.
भोर शहराला पाणीपुरवठा करणारी विहीर भाटघर धरणाच्या खालच्या बाजूस असून धरणाच्या भिंतीलगत चारी खोदून विहिरीत पाणी आणण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. मात्र, धरणातील पाणीसाठा अत्यल्प झाल्याने आणि वीजनिर्मिती केंद्र बंद असल्याने धरणाच्या भिंतीतून होणाऱ्या गळतीतील पाण्याचे प्रमाणही कमी झाले आहे. त्यामुळे विहिरीतील पाण्याची पातळी घटली असून त्याचा थेट परिणाम शहराच्या पाणीपुरवठ्यावर होत आहे.भोर शहराला दररोज सुमारे ५० लाख लिटर पाण्याची आवश्यकता असते. पाणी उपसा करण्यासाठी ९० अश्वशक्ती आणि ६० अश्वशक्ती क्षमतेचे प्रत्येकी दोन पंप बसविण्यात आले आहेत. मात्र, पाण्याची पातळी कमी झाल्यामुळे सध्या एक ९० एचपी आणि एक ६० एचपी पंपच सुरू ठेवता येत आहेत. त्यामुळे आवश्यक प्रमाणात पाणी उपसा होत नसल्याने नागरिकांना दिवसाआड आणि कमी दाबाने पाणीपुरवठा केला जात असल्याची माहिती मुख्याधिकारी गजानन शिंदे यांनी दिली.
---------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु