परतवाड्यात राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष अभिषेक शुक्ला यांचा राजीनामा
अमरावती, 29 मे (हिं.स.) : परतवाडा शहरातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मोठा राजकीय धक्का बसला असून, पक्षाचे शहराध्यक्ष अभिषेक उर्फ रिंकू शुक्ला यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. त्यांच्या अचानक घेतलेल्या निर्णयामुळे स्थानिक राजकीय वर्तुळात चर्च
राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा धक्का ▪️परतवाडा शहराध्यक्ष  रिंकू शुक्ला यांचा राजीनामा


अमरावती, 29 मे (हिं.स.) : परतवाडा शहरातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मोठा राजकीय धक्का बसला असून, पक्षाचे शहराध्यक्ष अभिषेक उर्फ रिंकू शुक्ला यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. त्यांच्या अचानक घेतलेल्या निर्णयामुळे स्थानिक राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले असून, पक्षाच्या संघटनात्मक बांधणीवर त्याचा परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

माहितीनुसार, शुक्ला यांनी 28 मे रोजी जिल्हाध्यक्ष संतोष महात्मे यांच्याकडे आपला राजीनामा सादर केला. राजीनामा पत्रात त्यांनी पक्षाने आजपर्यंत दिलेल्या जबाबदाऱ्यांबद्दल कृतज्ञता व्यक्त करत, विविध पदांवर काम करण्याची संधी दिल्याबद्दल पक्ष नेतृत्वाचे आभार मानले आहेत. तसेच आपला राजीनामा स्वीकारण्यात यावा, अशी विनंतीही त्यांनी केली आहे.

अभिषेक उर्फ रिंकू शुक्ला हे परतवाडा शहरातील राष्ट्रवादी काँग्रेसचे आक्रमक आणि सक्रिय नेतृत्व म्हणून ओळखले जात होते. स्थानिक प्रश्नांवर त्यांनी पक्षाची भूमिका ठामपणे मांडली होती. युवकांमध्ये त्यांचा प्रभाव असल्याने त्यांच्या राजीनाम्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

विशेषतः आगामी स्थानिक राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर हा राजीनामा राष्ट्रवादी काँग्रेससाठी धक्कादायक मानला जात आहे. दरम्यान, त्यांच्या राजीनाम्यामागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसले तरी शहरातील राजकीय वातावरण तापले असून विविध तर्कवितर्कांना उधाण आले आहे.

आगामी काळात अभिषेक उर्फ रिंकू शुक्ला कोणती भूमिका घेणार आणि त्यांच्या पुढील राजकीय वाटचालीचा निर्णय काय असेल, याकडे आता राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

----------------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande