
पुणे, 29 मे (हिं.स.)। बारामतीच्या राजकारणात नव्या नेतृत्वाबाबत पुन्हा एकदा चर्चा रंगू लागली आहे. दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर बारामतीचे नेतृत्व कोणाकडे जाणार, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले असताना युवा नेते जय पवार आणि युगेंद्र पवार यांनी मतदारसंघात सक्रिय हालचाली सुरू केल्या आहेत.बारामती विधानसभा पोटनिवडणुकीच्या प्रचारादरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) पक्षाचे युवा नेते जय पवार प्रथमच मोठ्या प्रमाणात बारामतीकरांच्या संपर्कात आले. यावेळी त्यांनी, “२०२९ च्या विधानसभा निवडणुकीत मी उमेदवार असावा, अशी जनतेची इच्छा आहे,” असे विधान केले होते. पोटनिवडणुकीनंतरही त्यांनी जनसंपर्क कायम ठेवत ‘जनता दरबार’ उपक्रम सुरू केला असून त्याला नागरिकांकडून प्रतिसाद मिळत आहे.दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) पक्षाचे युवा नेते युगेंद्र पवार यांनीही ग्रामीण भागात सक्रियता वाढविली आहे. २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी दिवंगत अजित पवार यांच्या विरोधात निवडणूक लढविली होती. पराभवानंतरही त्यांनी मतदारसंघातील संपर्क कायम ठेवत आता ‘गावभेट मोहीम’ सुरू केली आहे. ग्रामीण भागात जाऊन नागरिकांशी संवाद साधण्यावर त्यांनी भर दिला आहे.जय पवार यांच्या ‘जनता दरबार’ आणि युगेंद्र पवार यांच्या ‘गावभेट मोहिमे’मुळे बारामतीच्या राजकारणात नव्या नेतृत्वाची चर्चा पुन्हा एकदा जोर धरू लागली आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु