
सोलापूर, 29 मे (हिं.स.)।
सोलापूर शहर आणि जिल्ह्यात वाहनांसाठी दररोज सुमारे १०० ते १२० मेट्रिक टन सीएनजी इंधनाची आवश्यकता भासत आहे. मात्र, सोलापुरातील औद्योगिक वसाहतीमध्ये सध्या केवळ ७० मेट्रिक टन क्षमतेचे सीएनजी उत्पादन होत असल्याने पुरवठ्यावर ताण निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर प्रशासनाने बैठक घेऊन येत्या पंधरा दिवसांत उत्पादन क्षमता वाढवून ती ९५ मेट्रिक टनांपर्यंत नेण्याचा निर्णय घेतल्याची माहिती जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांनी दिली.
वाहनांसाठी लागणारे सीएनजी इंधन एलएनजीच्या स्वरूपात गुजरातमधील दाभोळ येथून सोलापुरात आणले जाते. औद्योगिक वसाहतीमध्ये त्यावर प्रक्रिया करून सीएनजी तयार केले जाते. सध्या सुमारे ६०० मेट्रिक टन एलएनजीचा साठा उपलब्ध असून उत्पादन क्षमता वाढल्यानंतर सीएनजी पुरवठा अधिक सुरक्षित आणि सुरळीत होईल, असे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.दरम्यान, सोलापूर शहर आणि जिल्ह्यात पेट्रोल व डिझेलचा कोणताही तुटवडा नसल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. नागरिकांनी घाबरून इंधनाचा अतिरिक्त साठा करू नये, असे आवाहनही करण्यात आले आहे.तसेच, इंधन पंपावरून ड्रममधून शेतकऱ्यांना इंधन देताना त्यांची नोंद ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. या नोंदींची रँडम तपासणी करून संबंधित शेतकरी इंधनाचा वापर शेतीकामासाठी करत आहेत की काळाबाजारासाठी, याची पडताळणी केली जाणार असल्याचेही जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांनी सांगितले.
---------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड