
अमरावती, २९ मे (हिं.स.) : ग्रामजयंती पर्वानिमित्त विश्वशांती व सामाजिक ऐक्याचा संदेश देण्यासाठी अमरावती येथे सामुदायिक प्रार्थनेचे आयोजन करण्यात आले आहे. ही प्रार्थना सभा शुक्रवार, ३० मे रोजी सायंकाळी ६.३० वाजता पंचवटी चौकातील डॉ. पंजाबराव उर्फ भाऊसाहेब देशमुख यांच्या स्मारकाजवळ होणार आहे.
या उपक्रमात ७० हून अधिक सामाजिक संस्था तसेच गुरुदेव सेवा मंडळ सहभागी होणार असून नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे. सायंकाळी ६ वाजल्यापासून प्रार्थनास्थळी नोंदणी प्रक्रिया सुरू होईल. त्यानंतर खंजिरी भजन, सामाजिक राष्ट्रवंदना आणि समारोपाचा कार्यक्रम पार पडणार आहे.
आयोजकांच्या माहितीनुसार, सध्याच्या समाजात जात, धर्म, पंथ, भाषा, प्रांत आणि विचारधारांच्या नावावर भिंती निर्माण होत असून माणूस माणसापासून दूर जात आहे. अशा परिस्थितीत सामुदायिक प्रार्थना समाजाला एकत्र आणण्याचे आणि बंधुभाव वाढविण्याचे कार्य करत असल्याचे त्यांनी नमूद केले.
सेवा सामर्थ्य बहुउद्देशीय संस्था अंतर्गत युगप्रभात फाउंडेशनच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या या भव्य सामुदायिक प्रार्थनेत नागरिक, गुरुदेव भक्त आणि विविध सामाजिक संस्थांनी सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
---------------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी