
नाशिक, 29 मे (हिं.स.)
शहरातील प्रभाग क्रमांक ७, १२ व १३ या भागांना पुरेसा आणि शुद्ध पाणीपुरवठा उपलब्ध व्हावा यासाठी गंगापूर धरणातून पाणी बारा बंगला येथे आणून त्या ठिकाणी अत्याधुनिक फिल्टरेशन प्लांट उभारण्याचे नियोजन करण्यात आले होते. या प्रकल्पासाठी स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत सन २०२२ मध्ये कार्यारंभ आदेशही देण्यात आले होते. मात्र, अनेक दिवस उलटूनही काम पूर्णत्वास जात नसल्यामुळे नागरिकांना कृत्रिम पाणीटंचाईचा सामना करावा लागत असल्याची गंभीर बाब समोर आली आहे.या पार्श्वभूमीवर आमदार प्रा. सौ. देवयानी फरांदे यांनी बारा बंगला येथील फिल्टरेशन प्लांटच्या कामाची प्रत्यक्ष पाहणी करून संबंधित अधिकाऱ्यांना व ठेकेदाराला काम तातडीने पूर्ण करण्याचे कठोर निर्देश दिले. यावेळी त्यांनी कामाची गती वाढवून दिवसा बरोबरच रात्रीच्या वेळीदेखील काम सुरू ठेवण्याच्या सूचना दिल्या.आमदार फरांदे यांनी सांगितले की, प्रभाग ७, १२ व १३ मधील नागरिकांना अनेक दिवसांपासून अपुऱ्या पाणीपुरवठ्याचा त्रास सहन करावा लागत आहे. स्मार्ट सिटी योजनेतील महत्त्वाचा प्रकल्प असूनही काम रखडल्यामुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी आहे. त्यामुळे संबंधित यंत्रणांनी कोणतीही कारणे न देता काम युद्धपातळीवर पूर्ण करावे.यावेळी अधीक्षक अभियंता, पाणीपुरवठा विभाग श्री. धारणकर यांनी पुढील तीन दिवस हे काम दिवस-रात्र सुरू ठेवण्यात येईल तसेच डिसेंबर २०२६ पर्यंत फिल्टरेशन प्लांट पूर्णपणे कार्यान्वित करण्यात येईल, असे आश्वासन दिले.या पाहणी दौऱ्यावेळी माजी महापौर विनायक पांडे, नगरसेवक बबलू शेलार, शहर अभियंता अग्रवाल साहेब, स्मार्ट सिटी चे ceo श्री सुमंत मोरे, कार्यकारी अभियंता गणेश मैड, श्री निकम तसेच पाणीपुरवठा विभागाचे अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रकल्प अधिकारी आशिष सूर्यवंशी, नवीन पाटेकर सदर फिल्टरेशन प्लांट कार्यान्वित झाल्यानंतर प्रभाग ७, १२ व १३ मधील हजारो नागरिकांना नियमित, स्वच्छ व पुरेसा पाणीपुरवठा उपलब्ध होणार असल्याने नागरिकांकडून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV