
कोल्हापूर, 29 मे (हिं.स.) : छत्रपती प्रमिलाराजे सर्वोपचार रुग्णालय (सीपीआर) येथे सुमारे २५० कोटी रुपयांच्या अत्याधुनिक आरोग्य सेवा-सुविधांचे लोकार्पण वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते करण्यात आले. या नव्या सुविधांमुळे कोल्हापूरसह पश्चिम महाराष्ट्रातील रुग्णांना दर्जेदार आणि आधुनिक उपचार सेवा जिल्ह्यातच उपलब्ध होणार असल्याचा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष तथा आमदार राजेश क्षीरसागर होते. प्रमुख उपस्थिती म्हणून महापौर रूपाराणी निकम उपस्थित होत्या. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड, महापालिका आयुक्त डॉ. राजेंद्र भारूड, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. जॅसमिन, अधिष्ठाता डॉ. सदानंद भिसे, डॉ. अजित लोकरे यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते.
यावेळी बोलताना मंत्री हसन मुश्रीफ म्हणाले की, “१९८५ साली उभारलेल्या या इमारतीचा कायापालट करण्याचे भाग्य मला लाभले. सीपीआर रुग्णालय हे पश्चिम महाराष्ट्रातील सर्वसामान्यांचे आधारवड असून येथे महानगरांप्रमाणे आधुनिक उपचार सुविधा उपलब्ध करून देण्याचा शासनाचा प्रयत्न आहे. नव्याने सुरू झालेल्या सुविधा रुग्णांसाठी दिलासादायक ठरणार आहेत.”
ते पुढे म्हणाले की, वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण आणि सामान्य रुग्णांना सर्व आरोग्य सुविधा आता जिल्ह्यातच उपलब्ध होतील. “एकही रुग्ण उपचारासाठी बाहेर जाणार नाही, अशा सुविधा शहरात निर्माण केल्या जात आहेत,” असेही त्यांनी सांगितले. पुढील महिन्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते सीपीआरमधील पुढील विकासकामांचे उद्घाटन होणार असल्याची माहितीही त्यांनी दिली.
आमदार राजेश क्षीरसागर यांनी हसन मुश्रीफ यांचे कौतुक करताना सांगितले की, “आरोग्यदूत म्हणून त्यांची ओळख निर्माण झाली असून जिल्ह्यात दोन हजार कोटी रुपयांचा निधी आणून त्यांनी आरोग्य सेवेचे वैभव उभे केले आहे.”
महापौर रूपाराणी निकम यांनी प्रत्येक रुग्णाला कुटुंबातील सदस्य समजून सेवा देण्याचे आवाहन वैद्यकीय अधिकाऱ्यांना केले. जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांनी जिल्ह्यात वाढणाऱ्या आरोग्य सेवा या अभिमानाची बाब असल्याचे नमूद केले. महापालिका आयुक्त डॉ. राजेंद्र भारूड यांनी या स्वप्नवत उभारलेल्या शासकीय वास्तूची जपणूक करून निरंतर सेवा देण्याचे आवाहन केले.
लोकार्पण करण्यात आलेल्या सुविधांमध्ये श्वसनविकार आणि फुफ्फुसासंबंधी आजारांसाठी इंटेन्सिव्ह रेस्पिरेटरी केअर युनिट (RICU) संलग्न पल्मनरी लॅबोरेटरीचा समावेश आहे. येथे १० बेड, व्हेंटिलेटर सुविधा आणि मल्टीपॅरा मॉनिटर उपलब्ध करण्यात आले आहेत. तसेच मेडिकल आयसीयूमध्ये ४० बेड, तर सर्जिकल आयसीयूमध्ये १६ बेडची सुविधा निर्माण करण्यात आली आहे.
याशिवाय पश्चिम महाराष्ट्रात प्रथमच शासकीय रुग्णालयात रोबोटिक आर्मयुक्त फिजिओथेरपी लॅब सुरू करण्यात आली आहे. यामध्ये रोबोटिक गेट ट्रेनिंग सिस्टम तसेच फिजिओथेरपी आणि ऑक्युपेशनल थेरपीसाठी आवश्यक अत्याधुनिक यंत्रसामग्री उपलब्ध करण्यात आली आहे. फार्माकोजेनोमिक लॅब आणि अत्याधुनिक कान, नाक व घसा विभागाचाही या सुविधांमध्ये समावेश आहे.
कार्यक्रमाच्या प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते नव्या सुविधांचे लोकार्पण करण्यात आले आणि सर्व विभागांची पाहणी करण्यात आली. डॉ. सदानंद भिसे यांनी प्रास्ताविकातून रुग्णालयातील विकासकामांची माहिती दिली. कार्यक्रमास वैद्यकीय शिक्षण विभागातील अधिकारी, डॉक्टर, कर्मचारी, विविध संस्थांचे प्रतिनिधी तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. शेवटी डॉ. भूषण मिरजे यांनी आभार प्रदर्शन केले. तसेच गट-४ मधील नव्याने भरती झालेल्या कर्मचाऱ्यांना नियुक्तीपत्रांचे वितरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
--------------------
हिंदुस्थान समाचार / VijayKumar Pandurang Powar