
येवला, 29 मे (हिं.स.)। येवला शहरातून या क्षणाची एक अत्यंत मोठी आणि धक्कादायक बातमी समोर येत आहे. येवला तहसील कार्यालयाच्या प्रांगणात आत मध्ये असलेल्या एका चहाच्या टपरीवर अचानक गॅस सिलेंडरचा भडका उडाल्याने संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या घटनेमुळे शासकीय संकुलात कमालीची दहशत निर्माण झाली आहे.
येवला तहसील कार्यालयाचे प्रांगण हे नेहमीच नागरिकांच्या आणि शासकीय कर्मचाऱ्यांच्या वर्दळीने गजबजलेले असते. याच तहसील कार्यालयाच्या कंपाऊंडमध्ये असलेल्या एका चहाच्या टपरीवर आज अचानक गॅसची टाकी पेटली. गॅसचा भडका उडताच आजूबाजूला असलेल्या लोकांची एकच पळापळ झाली.
महत्त्वाची बाब म्हणजे, याच प्रशासकीय संकुल परिसरात
सहाय्यक दुय्यम निबंधक कार्यालय, राज्य उत्पादन शुल्क विभाग, येवला तहसील कार्यालय, कृषी विभाग आणि येवला नगरपालिका प्रशासकीय कार्याल यांसारखी महत्त्वाची शासकीय कार्यालये एकाच ठिकाणी कार्यरत आहेत.
हजारो नागरिकांची रोज येथे ये-जा असते. अशा अत्यंत संवेदनशील आणि गजबजलेल्या ठिकाणी गॅस सिलेंडरने अचानक पेट घेतल्याने संपूर्ण परिसरात मोठी दहशत निर्माण झाली आहे.
या आगीमुळे तहसील परिसरातील सुरक्षेचा आणि धोक्याचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाले नाही. परंतु एवढ्या मोठ्या शासकीय संकुलाच्या आवारात अशा प्रकारे अनधिकृत किंवा असुरक्षित व्यावसायिक टपऱ्यांमुळे भविष्यात मोठी दुर्घटना घडली, तर त्याला जबाबदार कोण? असा संतप्त सवाल आता नागरिक उपस्थित करत आहेत.
या घटनेनंतर प्रशासनाकडून या टपऱ्यांवर आणि सुरक्षेच्या उपाययोजनांवर काय कारवाई केली जाते, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.
---------------
हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV