रत्नागिरी रेल्वेस्थानकावर स्वच्छतागृहासाठी अवैधरीत्या ५ रुपयांची वसुली
रत्नागिरी, 29 मे (हिं.स.) । रत्नागिरी रेल्वे स्थानकावर प्रवाशांकडून स्वच्छतागृह वापरण्यासाठी बेकायदेशीरपणे ५ रुपये शुल्क आकारले जात असल्याचा प्रकार युवासेनेने उघडकीस आणला आहे. या प्रकरणी ठाकरे युवासेना जिल्हा प्रमुख प्रसाद सुरेश सावंत यांनी आज कोकण
जिल्हा रेल्वे प्रबंधकांना उबाठा युवा सेनेचे निवेदन


रत्नागिरी, 29 मे (हिं.स.) । रत्नागिरी रेल्वे स्थानकावर प्रवाशांकडून स्वच्छतागृह वापरण्यासाठी बेकायदेशीरपणे ५ रुपये शुल्क आकारले जात असल्याचा प्रकार युवासेनेने उघडकीस आणला आहे. या प्रकरणी ठाकरे युवासेना जिल्हा प्रमुख प्रसाद सुरेश सावंत यांनी आज कोकण रेल्वे क्षेत्रीय प्रबंधक शैलेश बापट यांना निवेदन देऊन तातडीने कारवाईची मागणी केली आहे.

रत्नागिरी रेल्वे स्थानकावरील 'पे अँड यूज'च्या बोर्डावर लघुशंकेसाठी प्रतिव्यक्ती ५ रुपये शुल्क लिहिले आहे. कंत्राटदाराकडून हे शुल्क सक्तीने वसूल केले जात आहे. भारतीय रेल्वेच्या नियमानुसार रेल्वे स्थानकांवर लघुशंकेची सुविधा प्रवाशांसाठी पूर्णपणे मोफत असणे बंधनकारक आहे. मात्र रत्नागिरीतील कंत्राटदार नियमांचे सर्रास उल्लंघन करत असल्याचा आरोप युवासेनेने केला आहे.दररोज हजारो प्रवासी, विशेषतः कोकणात येणारे चाकरमानी, महिला, वृद्ध प्रवाशांना याचा मोठा भुर्दंड सहन करावा लागत आहे. रेल्वे प्रशासनाच्या नाकाखाली ही बेकायदेशीर वसुली सुरू असणे अत्यंत संतापजनक आहे, असे युवासेना जिल्हाप्रमुख प्रसाद सावंत यांनी निवेदनात म्हटले आहे.

निवेदनात स्वच्छतागृहात लघुशंकेसाठी आकारले जाणारे 5 रुपये शुल्क त्वरित बंद करून ही सुविधा मोफत करावी, नियमांचे उल्लंघन करून प्रवाशांना लुटणाऱ्या कंत्राटदारावर कडक दंडात्मक कारवाई करावी, 'लघुशंकेसाठी कोणतीही फी नाही, ही सुविधा मोफत आहे' असे फलक स्थानकावर ठळकपणे लावावेत, अशा प्रमुख मागण्या करण्यात आल्या आहेत.रेल्वे प्रशासनाने यावर त्वरित कारवाई न केल्यास उबाठा युवासेनेतर्फे प्रवाशांच्या हक्कासाठी स्थानकावर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे. याची संपूर्ण जबाबदारी रेल्वे प्रशासनाची असेल, असेही निवेदनात नमूद आहे.रेल्वे स्थानक रस्त्यावरील वरील दुभाजकामधील झाडे वाहनचालकांसाठी धोकादायक असल्याने ती झाडे योग्य आकारामध्ये तोडावी अशी विनंती ही यावेळी करण्यात आली. यावेळी रितेश लोखंडे, निलेश पवार, साई गावडे, निखिल बने, ओमकार कारेकर उपस्थित होते.

---------------

हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी


 rajesh pande